मंत्री दिपक केसरकर यांची रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव याच्याजवळ मागणी
सावंतवाडी
पर्यटकांच्या सोयीसाठी व जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वंदे भारत एक्सप्रेस ला सावंतवाडी येथे दुसरा थांबा देण्यात यावा अशी विनंती शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याजवळ केली आहे. तर पुढील टप्प्यात वंदे भारत एक्सप्रेसला सावंतवाडी येथे दुसरा थांबा मिळेल असे मंत्री केसरकर यांना आश्वासित करण्यात आले.
मंत्री केसरकर यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात असे म्हटले की, मुंबई गोवा दरम्यान उद्या दि 3 जून पासून वंदे भारत एक्सप्रेस ही रेल्वे सेवा सुरू होत आहे.सदर रेल्वेसेवेचे उदघाटन मा पंतप्रधान महोदय यांचे हस्ते होत आहे. सदर रेल्वे सेवेचा फायदा मुंबईशी जलद दळणवळण होणार असल्याने सर्व कोकणवासीयांना होणार आहे.
सदर वंदे भारत एक्सप्रेस ला कोकणातील रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यात प्रत्येकी दोन थांबे देण्यात आले आहेत.तथापि सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त कणकवली येथे एकच थांबा देण्यात आला आहे .सिंधुदुर्ग हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळ असून दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक सिंधुदुर्गला भेट देतात. सावंतवाडी हे महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्याच्या सीमे जवळचे ठिकाण आहे.त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस ला दोन थांबे दिल्यास पर्यटकांना चांगली सुविधा उपलब्ध होईल व पर्यटन वाढेल. असे असताना ही वंदे भारत एक्सप्रेस ला जिल्ह्यात एकाच थांबा दिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नाराजी आहे.
त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांमधील नाराजी दूर करण्यासाठी,पर्यटकांच्या सोयीसाठी व जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वंदे भारत एक्सप्रेस ला सावंतवाडी येथे दुसरा थांबा देण्यात यावा अशी विनंती मंत्री केसरकर यांनी केली आहे.
