⚡कणकवली ता.३०-: नुकताच उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०२३ चा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. या परीक्षेमध्ये कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सचा विद्यार्थी श्रीराम श्रीकांत बाक्रे याने संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. श्रीराम याने १०० गुण प्राप्त करत प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२१ मध्ये सुद्धा त्याने संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला होता.
क. ग. शि. प्र. मंडळ, मुंबई संचलित श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड काॅमर्स आणि श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या प्रशालेचा निकाल दरवर्षी प्रमाणे १००% लागला. अनेक विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले. आता श्रीराम च्या या यशामुळे त्यात आता विशेष भर पडली आहे.
कोणत्याही भाषा विषयात पैकीच्या पैकी गुण प्राप्त करणे अतिशय अवघड गोष्ट असते. पणं श्रीकांत याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत संस्कृत विषयात पैकीच्या पैकी गुण प्राप्त करत फार मोठे यश प्राप्त केले आहे.
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समितीचे चेअरमन आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी या उज्ज्वल यशाबद्दल श्रीराम याचे अभिनंदन केले.श्रीराम याला प्रशालेचे संस्कृत अध्यापक मकरंद आपटे यांचे मार्गदर्शन लाभले.
