पाय घसरून नदीपात्रात बुडालेल्या युवकाचा मृतदेह आढळला

⚡कणकवली ता.०४-: कणकवली -आचरा मार्गावरील वरवडे येथील गडनदी पात्रातील
सनसेट पॉईंट येथील मोठया खडकावर बसून सेल्फी काढत असताना हरीकृष्णन टी. मनोज (वय – १७, रा.कणकवली, मुळ रा.केरळ) हा युवक पाय घसरुन काल सायंकाळी ६.१५ वाजता बुडाला होता. त्यांचा मृतदेह आज सकाळी ७ वाजता नदीपात्रात बुडालेला आढळून आला. मृतदेहाचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.हरीकृष्णन हा कणकवली कॉलेजमध्ये शिकत होता.त्याच्या दुःखद निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त की
काल कणकवली येथील तीन युवक वरवडे नदीपात्रात सनसेट पॉईंट येथे एका दगडावर बसून मोबाईल मधून सेल्फी घेत होते. अचानक हरीकृष्णन यांचा पाय घसरला आणि काही क्षणातच तो नदीत बुडाला.काही वेळाने त्याच्या सोबत असलेल्या मित्राने घरी कळविले. तेव्हा त्या बुडालेला हरीकृष्णन यांचा काका आणि नागरिकांनी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी जात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला,मात्र रात्र झाल्याने शोध लागला नव्हता.

आज कणकवली पोलिसांनी पुन्हा सकाळी घोरपी समाजाच्या लोकांना घेऊन शोध मोहीम राबविली असता वरवडे नदीपात्रात पाण्यात हरीकृष्णन यांचा मृतदेह सकाळी ७ वाजता आढळून आला.पोलिस निरीक्षक अनिल जाधव पथकासह घटनास्थळी उपस्थित होते. तेथील नागरिकांच्या मदतीने त्या युवकाला शोधण्याची मोहीम यशस्वी झाली. हरीकृष्णन याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

You cannot copy content of this page