पक्क्या बंधाऱ्यासाठी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार : भाजप युवा कार्यकर्ते पिंट्या परब
⚡बांदा ता.२३-: मडुरा भुताचाटेम येथे दोन महिन्यापूर्वी माती व दगड यांच्या सहाय्याने ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधलेला बंधारा फुटला. या बंधाऱ्यावर कास व मडुरा गावातील शेतकरी विविध प्रकारची शेती बागायती करतात. पर्यायी सातोसे गावालाही येथून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी याकडे लक्ष देऊन आम्हाला पक्का बंधारा बांधण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी, भाजपा युवा कार्यकर्ते प्रवीण उर्फ पिंट्या परब यांनी केली आहे.
भुताचाटेम येथे दरवर्षी गावातील ग्रामस्थांच्या श्रमदानातून बंधारा उभारला जातो. मुबलक पाणी असल्याने ओहोळाच्या दुतर्फा वेगवेगळी रब्बी पिके घेतली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह बंधार्यावर बऱ्यापैकी अवलंबून आहे. बंधाऱ्याच्या पाण्यामुळे शेकडो एकर जमीन ओलिताखाली येते. प्रशासनाने शेतकऱ्यांचा विचार करून तात्पुरते दोन पाईप टाकल्यास पाण्याचा विसर्ग योग्य प्रमाणात होईल. सद्यस्थितीत पाणी मुबलक असले तरी भविष्यात मडुरा गावातील ग्रामस्थांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी सदर ठिकाणी पक्का बांधारा बांधून द्यावा अशी मागणी पिंट्या परब यांनी केली. तसेच यासंदर्भात लवकरच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन देत लक्ष वेधणार असल्याचेही श्री.परब यांनी सांगितले.
