ठाकरे गटाच्या साईप्रसाद काणेकर यांचे लक्षवेधी आंदोलन;बांदा ग्रामपंचायत समोरील खड्ड्याकडे बांधकामचे दुर्लक्ष
⚡बांदा ता.२२-: बांदा शहर ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्त्यालगत अवजड वाहतुकीमुळे भलामोठा जीवघेणा खड्डा पडला असून यामुळे वेळोवेळी अपघात झाले आहेत. हा खड्डा तात्काळ बुजवावा यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) बांदा शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी खड्ड्यातच वृक्षारोपण केले.
मुंबई गोवा महामार्गवरून बांदा शहरात येण्यासाठी हा अंतर्गत रस्ता आहे. या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी तसेच दिवसा देखील अवजड वाहतूक सुरु असते. या रस्त्यावरच शाळा व महाविद्यालय असल्याने मुलांची देखील वर्दळ असते. गेल्या चार दिवसात याठिकाणी अवजड वाहतुकीमुळे २ अपघात झाले होते.
रस्त्यालगत भलामोठा खड्डा पडला असून यामुळे रस्त्यावरून गाडी चालविणे हे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे तात्काळ याची दखल घेत खड्डा बुजवावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी श्री काणेकर यांच्यासह अनिश केसरकर, सागर मोर्ये, प्रथमेश पडवळकर, ओंकार नाडकर्णी, मंदार देसाई, भाऊ वाळके, मनसेचे माजी बांदा विभाग अध्यक्ष मिलिंद सावंत आदी उपस्थित होते.
