बाबासाहेबांचे जीवनचरित्र विद्यार्थ्यांनी अध्ययन करावे…

प्रा. रूपेश पाटील;शिरोडा येथे संत रोहिदास उत्कर्ष मंडळातर्फे डॉ. आंबेडकर जयंती साजरा

⚡सावंतवाडी ता.१६-: ज्या विद्यार्थ्याला कधी काळी वर्गाबाहेर बसून अध्ययन करावे लागले, त्या विद्यार्थ्याने जगातील सर्वात मोठी लेखी स्वरूपाची राज्यघटना भारताला प्रदान केली. बुद्धिमत्तेचे विलक्षण तेज असतानाही अंगी नम्रता, स्वाभिमान व प्रामाणिकपणा असा त्रिवेणी संगम असलेले थोर महामानव म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांना कितीही वंदन केले तरी ते कमीच आहे. अत्यंत कठीण संघर्षातून स्वतःला घडवत देशातील जनसामान्यांचे भले करणाऱ्या विश्ववंदनीय बाबासाहेबांचे चरित्र प्रत्येक विद्यार्थ्यांने अध्ययन करणे गरजेचे आहे, असे मत सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक रुपेश पाटील यांनी शिरोडा येथे व्यक्त केले.

शिरोडा (ता.वेंगुर्ला) येथील गुरुवर्य अ. वि. बावडेकर विद्यालय येथे संत रोहिदास उत्कर्ष मंडळ, आसोली यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी झाली. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. रुपेश पाटील बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत उत्कर्ष मंडळ, आसोलीचे अध्यक्ष अनंत आसोलकर होते.
यावेळी विचारपिठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश सुकी, पर्यवेक्षक मंगेश कांबळी, संत रोहिदास मंडळाचे सचिव कृष्णा चव्हाण, खजिनदार प्रा. प्रतिभा चव्हाण, सौरभ माळवदे, मंगेश चव्हाण, मधुकर माडकर, शिक्षकवृंद निशा वालावलकर, राजेश राठीये,
कुणाल बांदेकर, कविता कामते, पल्लवी नाईक, तन्वी ओटवणेकर,रामनाथ ईदे, विनायक मांजरेकर, राजू चव्हाण व कर्मचारी वृंद सूर्यकांत टेंबकर, प्रकाश यादव, होमदेव निनावे, श्रीगुरू साळगावकर आदी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व उपस्थितांचे स्वागत प्रा. प्रतिभा चव्हाण यांनी केले.

दरम्यान प्राध्यापक रुपेश पाटील पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब यांचे कार्य केवळ कोणत्याही एका जातीवर्गापुरते मर्यादित नसून ते अखिल मानवतेसाठी प्रेरणादायी व न्यायिक आहे. कारण बाबासाहेब हे जैविक बुद्धिवंत होते जे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न न्यायिक पद्धतीने सोडविण्यासाठी झटले. आज अशा महामानवाच्या चरित्राचे अध्ययन करणे विद्यार्थ्यांसाठी खूप गरजेचे आहे असेही पाटील यांनी नमूद केले.
कार्यक्रमात प्रा. प्रतिभा चव्हाण यांनीही आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या कामगिरीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा वालावलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश राठीये यांनी केले. कार्यक्रम संपल्यावर विद्यार्थ्यांना संत रोहिदास उत्कर्ष मंडळातर्फे खाऊचे वाटप करण्यात आले.

You cannot copy content of this page