अँड.. वैशाली डोळस यांचे प्रतिपादन
मालवण (प्रतिनिधी)
आजच्या पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून गरजेचे आहे. त्यांनी त्याकाळी हाल अपेष्टा सोसून आपल्यासाठी करून ठेवलेले कार्य लक्षात घेणे आणि त्यांच्या विचारांनुसार आपण समाजासाठी काय करू शकतो, हे ठरविणे महत्वाचे आहे. आज डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे संस्कार वर्ग चालविले पाहिजेत. डॉ. आंबेडकरांच्या विद्वत्तेचा वारसा घराघरात आला पाहिजे, असे प्रतिपादन ऍड. वैशाली डोळस यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील फुले शाहू आंबेडकर विचारमंच तर्फे आज मालवणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा झाला. यनिमित्त सकाळी मालवण एस.टी. स्टॅन्ड मागील समाज मंदिर येथे पूजा पाठ करण्यात आला. त्यानंतर एस.टी. स्टॅन्ड येथून भरड ते बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळ ते बांगीवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत भव्य धम्म रॅली काढण्यात आली. या रॅलीत आमदार वैभव नाईक यांनीही सहभाग दर्शवीला.
यानंतर मामा वारेरकर नाट्यगृहात जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, प्रमुख वक्त्या ऍड. वैशाली डोळस, फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष आनंद मालवणकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक वामनराव खोत, विचारमंचच्या महिला विभाग अध्यक्ष नेहा तांबे, युवामंच अध्यक्ष परेश मालवणकर आदी उपस्थित होते. आनंद मालवणकर यांनी प्रास्ताविक करत स्वागत केले.
यावेळी मार्गदर्शन करताना ऍड. वैशाली डोळस म्हणाल्या, डॉ. आंबेडकरांनी देशातील नागरिकांना संविधानातून माणूस म्हणून जगण्याचे हक्क मिळवून दिले. समाजात महिलांना कायम दुय्यम स्थान मिळत असल्याने डॉ. आंबेडकरांनी महिलांना समानतेचा हक्क मिळवून दिला. तर त्यापूर्वी महात्मा फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून क्रांती घडवली. म्हणूनच आजच्या महिलांनी या महापुरुषांच्या कार्याचे स्मरण ठेवत त्यांच्या विचारांचे आचरण करून प्रगती साधली पाहिजे. तसेच तरुण पिढीनेही व्यसनाच्या आहारी न जाता समाजासाठी कार्यरत झाले पाहिजे, असेही ऍड. डोळस म्हणाल्या.
यावेळी आम. वैभव नाईक यांनीही विचार मांडत डॉ. आंबेडकर यांच्यामुळेच आज माझ्या सारखा कार्यकर्ता आमदार होऊ शकला. आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन आपण सर्वांनी वाटचाल केली पाहिजे, असे सांगितले. तर वामन खोत यांनी डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावर आज देश उभा आहे, त्यांच्या विचारांची, स्मरणाची ज्योत कायम तेवत ठेवली पाहिजे, असे सांगितले. तर मिलिंद जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात आजच्या पिढीने डॉ. आंबेडकरांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेतले पाहिजे, समाजासाठी वेळ दिला पाहिजे, असे सांगितले.
यावेळी प्रमुख वक्त्या ऍड. डोळस यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक, विद्यार्थी व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मिलिंद जाधव, रंजन तांबे, मारुती सोनवडेकर, सखाराम हसोळकर, दिक्षा मालवणकर, नितेश जाधव, रामदास जाधव, सुनील देऊलकर, राजेश गुळवे, सागर जाधव, संजय कोळंबकर, श्रीकांत जाधव, स्वाती कदम, बबन मालवणकर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राजेंद्र कदम यांनी केले, तर आभार दर्शना गुळवे यांनी मानले.
यावेळी सिद्धार्थ जाधव, विलास वळंजू, प्रा. कैलास राबते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक मंदार केणी, नितीन वाळके, आकांक्षा शिरपूटे, उमेश मांजरेकर, रंजन तांबे, प्रा. नागेश कदम, अनुष्का कदम, आर. डी. बनसोडे, अरविंद जाधव, दीपा शिंदे, निनाक्षी शिंदे, विलास देऊलकर, संजय जाधव, विशाखा वळंजू, आदी व इतर नागरिक उपस्थित होते.
