मालवणात होणाऱ्या गाबीत महोत्सवाला एक ते दीड लाख गाबीत बांधवांची उपस्थिती राहणार

परशुराम उपरकर;गाबीत बांधवांच्या सहकार्याने गाबीत महोत्सव यशस्वी करणार

⚡मालवण ता.२४-: विखुरलेल्या गाबीत समाजाला एकत्र आणतानाच गाबीत बांधवांचे प्रश्न संघटीतरित्या सोडविण्याच्यादृष्टीने
मालवणच्या दांडी किनाऱ्यावर दि. २७ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत होणारा गाबीत महोत्सव आयोजित करण्यात आला असून गाबीत समाजाच्या या पहिल्या वहिल्या या महोत्सवाला चार दिवसात महाराष्ट्रासह गुजरात, गोवा कर्नाटक अशा चार राज्यातील एक ते दीड लाख गाबीत बांधव उपस्थित राहणार आहेत या महोत्सवाच्या नियोजनासाठी २१ समित्या गठीत करण्यात आल्या असून सर्व गाबीत समाज बांधवांच्या सहकार्याने हा गाबीत महोत्सव यशस्वी होईल असा ठाम विश्वास अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम तथा जीजी उपरकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला .

अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ व गाबीत समाज महाराष्ट्र आणि गाबीत समाज सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गाबीत समाज मालवण तालुक्याच्या यजमानातून दि. २७ ते ३० एप्रिल या कालावधीत “गाबीत महोत्सवाचे” आयोजन मालवण दांडी किनारी करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज मालवण धुरीवाडा येथील संस्कार हॉल येथे गाबीत समाजाचे जिल्ह्यातील सर्व तालुका शाखांचे पदाधिकारी आणि गाबीत समाजातील कार्यकर्त्यांची बैठक संपन झाली.
यावेळी अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, सरचिटणीस महेंद्र पराडकर, हरी खोबरेकर, जिल्हा संघटक रविकिरण तोरसकर, मालवण तालुकाध्यक्ष डॉ.प्रमोद कोळंबकर, उपाध्यक्षा सौ. अन्वेषा आचरेकर, मेघा गांवकर, बाबी जोगी, सौ.सेजल परब, राजू परब, वेंगुर्ले तालुका सचिव किरण कुबल, दिलीप घारे, मेघनाद धुरी, देवगड तालुका सचिव संजय बांदेकर, सौ.उष:कला केळुसकर, नारायण धुरी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष ऍड.संदीप चांदेकर, सचिव दिपक तारी, सौ. दिक्षा ढोके, स्वाती कुबल, रश्मीन रोगे, अन्वय प्रभू, पांडुरंग कोचरेकर, भूषण मेतर आदी व इतर गाबीत समाज बांधव उपस्थित होते.

या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत परशुराम उपरकर म्हणाले, गाबीत महोत्सवाच्या दरम्यान ३० एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर झाल्याचे रौप्य महोत्सवी वर्ष असून हा योग साधून आला आहे. गाबीत महोत्सवासाठी सर्व नियोजन करण्यात येऊन सर्वांना जबाबदारी देण्यात आली आहे. नियोजनासाठी दांडीसह मालवण किनारपट्टीवरील वायरी, मेढा, धुरीवाडा, कोळंब, सर्जेकोट, तळाशील, आचरा तारकर्ली, देवबाग या भागातील गाबीत कार्यकर्त्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची बैठक उद्या २५ मार्च रोजी रामेश्वर मच्छिमार सोसायटी दांडी मालवण येथे होणार आहे, असेही उपरकर म्हणाले.

हा महोत्सव राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून होणार असून कोणत्याही प्रकारची राजकीय मदत घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करीत उपरकर यांनी या महोत्सवासाठी गाबीत बांधवांकडून निधी संकलन करण्यात येत आहे. महोत्सवाचे व्यासपीठ हे गाबीत समाजातील बांधवाना आपल्या कलागुणांचे दर्शन घडविण्यासाठी असणार असून व्यासपीठावर कोणतीही राजकीय भाषणे होणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरामारात सहभागी असणारा गाबीत समाज असून मालवण येथे महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला उभारून आरामाराची राजधानी उभारली. म्हणूनच हा गाबीत महोत्सव मालवणात आयोजित करण्यात आला आहे महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मोरयाचा धोंडा येथे पूजन करून सागरात बहुसंख्य नौकांच्या उपस्थितीत मशाली प्रज्वलीत करण्यात येणार आहेत, असेही परशुराम उपरकर म्हणाले.

या महोत्सवात राष्ट्रीय व राज्य स्तरावर कार्य करणाऱ्या गाबीत बांधवांचा गाबीत भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. देवगड येथील मंडळाचा शिमगोत्सव साजरा होणार आहे. तर २९ एप्रिल रोजी सागरी सुंदरी स्पर्धा होणार आहे. ऑर्केस्ट्रा, नृत्य सादरीकरण तसेच तीन दिवस विविध विषयांवर परिसंवाद होणार आहेत. तसेच महोत्सवात गाबीत बांधवांचे विविध स्टॉल असणार असून यामध्ये मासळी वर आधारित पदार्थांची रेलचेल असणार आहे. मच्छिमारीच्या विविध पारंपारिक पद्धती याविषयी युवकांना व येणाऱ्या पर्यटकांना प्रत्यक्षिकासह माहिती देण्यात येणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात तालुकावार गाबीत बांधवांच्या क्रिकेट स्पर्धा होणार असून त्यातील विजेत्यांची अंतिम फेरी मालवणात २६ एप्रिलला मालवण दांडी झालझुल मैदानावर होणार आहे.

गाबीत महोत्सवाच्या निमित्ताने गाबीत ध्वजाचे अनावरण करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या व्यासपीठाला मच्छिमार नेते कै. ज्ञानेश देऊलकर यांचे, परीसंवाद मंडपास स्वातंत्र्य सैनिक कै.हिरोजी तोडणकर यांचे, प्रवेशद्वारास हुतात्मा दत्ताराम कोयंडे यांचे तर महोत्सव मंडपास मालवणचे माजी उपनगराध्यक्ष सुबोध आचरेकर यांचे नाव देण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी पर्यटन महामंडळ, मत्स्य विभाग, बँका, एलआयसी अशा विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या मार्फत गाबीत बांधवाना विविध विषयांवर मार्गदर्शनही करण्यात येणार आहे, असेही उपरकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page