तळवडेतील इसमाला बंद पॉलिसी सुरू करण्याचे अमिश दाखवून घातला १५ लाखांचा ऑनलाइन गंडा…

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

सावंतवाडी । प्रतिनिधी : ‘तुमची बंद झालेली विमा पॉलिसी सुरू करून देतो व त्यावर तब्बल ७५ लाख रुपये कर्ज मिळवून देतो ‘ असे आमिष दाखवून तळवडे येथील एका इसमाला तब्बल १५ लाख रुपयांना ऑनलाइन गंडा घालण्यात आला. चंद्रशेखर नारायण मल्हार ( ५५, रा. तळवडे परबवाडी ) असे त्यांचे नाव असून त्यांनी याबाबत सावंतवाडी पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर अज्ञाता विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुम्हाला लॉटरी लागली आहे, कर्ज मिळवून देतो, तुमच्या व्यवसायासाठी गुंतवणूक करतो अशी विविध आमिषे दाखवून अनेक लोकांना गंडा घालण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. मोबाईल वर आलेल्या मेसेज किंवा फोनच्या माध्यमातून अशा प्रकारे अनेक सर्वसामान्य लोकांची फसवणूक केली जात आहे. अनेक जण या प्रकारांना बळी पडत आहेत.
असाच काहीसा प्रकार तळवडे परबवाडी येथील चंद्रशेखर मल्हार यांच्या बाबतीत झाला. त्यांची एका खाजगी कंपनीची विमा पॉलिसी बंद झाली होती. ती पुन्हा सुरू करून देतो अशा स्वरूपाचा त्यांना मोबाईलवर कॉल आला. आपण संतोष भोसले नामक व्यक्ती असून संबंधित कंपनीत काम करीत आहे असे त्याने मल्हार यांना सांगितले. तसेच ही बंद पॉलिसी सुरू करून त्यावर तुम्हाला तब्बल ७५ लाख कर्ज मिळवून देतो असे आमीष्ही त्याने दाखविले.
संतोष भोसले नामक संबंधित फसव्या व्यक्तीने श्वेता मॅडम तुमच्याशी बोलतील असे सांगून त्यांना ही पॉलिसी सुरू करण्यासाठी तसेच कर्ज मिळवून देण्यासाठी काही रक्कम भरावी लागेल असे सांगितले. त्यांच्या या आमिषाला बळी पडून मल्हार यांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे थोडी थोडी करून तब्बल १५ लाख ८० हजार ८३० एवढी रक्कम त्यांनी सांगितलेल्या खात्यात ऑन लाईन पद्धतीने जमा केली. मात्र, त्यानंतर संबंधितांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आपण फसलो गेलो आहे असे मल्हार यांच्या लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार पोलिसांना प्रथम करून आपली फसवणूक झाली असल्याचे सांगितले. तसेच याबाबत परिसर तक्रारही सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार संबंधित अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे करीत आहेत.

You cannot copy content of this page