अन्यथा आठ दिवसांनी शिवसेना उद्घाटन करीत करणार खुले;अल्पसंख्यांक उपाध्यक्ष रियाज खान यांचा वाहतूक नियंत्रकांना इशारा
बांदा/प्रतिनिधी
बांदा बसस्थानक आवारात बांधण्यात आलेले स्वच्छतागृह अद्यापपर्यंत खुले करण्यात न आल्याने शिवसेनेचे अल्पसंख्याक सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष रियाज खान यांच्या नेतृत्वाखाली बसस्थानकात धडक देत वाहतूक नियंत्रक प्रकाश नार्वेकर यांना जाब विचारला. यावेळी येत्या आठ दिवसात स्वच्छतागृह खुले न केल्यास शिवसेनेच्या वतीने उदघाटन करून जनतेच्या सेवेसाठी खुले करण्याचा इशारा खान यांनी यावेळी दिला.
बांदा बसस्थानक आवारात जनतेच्या सेवेसाठी पे टॉयलेट उभारण्यात आले आहे. याचे बांधकाम होऊन दोन महिने उलटले तरी अद्यापपर्यंत जनतेच्या सेवेसाठी खुले करण्यात आले नाही. यासंदर्भात महिन्याभरपूर्वी शिवसेनेच्या वतीने याची विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी आठ दिवसात स्वच्छतागृह खुले करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापपर्यंत खुले न केल्याने शिवसेना पदाधिकारी आक्रमक झालेत.
आज सकाळीच रियाज खान यांच्या नेतृत्वाखाली राजा खान, मोहसीम खान, सागर धोत्रे, अक्षर खान, व्यंकटेश उरूमकर, रिझवान खान, सूर्या राठोड, प्रताप राठोड, लखन जाधव यांनी याठिकाणी धडक देत वाहतूक निरीक्षक प्रकाश नार्वेकर यांना जाब विचारला. यावेळी त्यांनी यासंदर्भात निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. खान यांनी कणकवली विभागीय कार्यालयातील विभागीय अभियंता अक्षय केंकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत कडक शब्दात जाब विचारला. त्यावेळी त्यांनी निविदा प्रक्रिया राबवून याचा मक्ता निश्चित करण्यात येईल व त्यानंतरच टॉयलेट सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले. सर्व प्रक्रियेला ८ दिवसांचा कालावधी लागणार असून येत्या २७ मार्च पर्यंत टॉयलेट सुरु करण्याचे आश्वासन दिले. येत्या ८ दिवसात स्वच्छतागृह सुरु न केल्यास शिवसेना स्टाईलने स्वच्छतागृह करून जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येईल असा इशारा खान यांनी यावेळी दिला.
