स्थानिकांना विश्वासात घेतले नाही;पर्यटन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कांदळवन विभागाला जाब विचारला
मालवण दि प्रतिनिधी
मालवण येथील सागरी अभयारण्याचा मसुदा चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आला असून याबाबत स्थानिक मच्छिमार व पर्यटन व्यावसायिक यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप आज जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ व तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण येथील कांदळवन विभागात धडक देत याबाबत जाब विचारला. या मसुद्याची प्रत आम्हाला मिळावी व त्याबाबत स्थानिकांना मार्गदर्शन करण्यासाठी चर्चासत्र आयोजित करून मसुद्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांचे म्हणणे नोंद करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मालवण येथील सागरी अभयारण्याचा मसुदा भारतीय वन्यजीव संस्थेने तयार करून कांदळवन विभागाकडे सादर केला असून तो शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. मात्र या मसूद्यात स्थानिकांचे म्हणणे घेतलेले नसल्याने याबाबत आज पर्यटन व्यवसायिकानी मालवण येथील कांदळवन विभागाच्या कार्यालयात कांदळवन विभागाचे जिल्हा समन्वयक रोहित सावंत यांची भेट घेतली. यावेळी पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, दिलीप घारे, मंगेश जावकर, रवींद्र खानलविलकर, दादा वेंगुर्लेकर, सौं. अन्वेषा आचरेकर, मिलिंद झाड, तुळशीदास कोयंडे, रामचंद्र चोपडेकर, अभय पाटकर, राहुल कोयंडे, रश्मीन रोगे आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात प्रवाळ मोठ्या प्रमाणात असून त्यांचे संवर्धन करणे हे महत्वाचे आहे. त्यासाठी मच्छिमार व स्कुबा व्यावसायिक यांचे सहकार्य नेहमीच लाभणार आहे. सागरी अभयरण्या द्वारे हे प्रवाळ क्षेत्र संरक्षित केले जाणार असले तरीही या सागरी अभयरण्यामुळे स्थानिक मच्छिमार व स्कुबा डायविंग व्यावसायिक यांच्यावर कोणतेही निर्बंध येता नयेत, त्यामुळेच सागरी अभयारण्याचा मसुदा तयार करताना मच्छिमार व पर्यटन व्यावसायिक यांना विश्वासात घेऊन त्यांची मते घेणे गरजेचे होते, असे बाबा मोंडकर यावेळी म्हणाले. सदर मसुदा कधी उपलब्ध होणार याची तारीख आम्हाला द्यावी. तसेच या मसूद्याबाबत चर्चासत्र आयोजित करून माहिती द्यावी, स्कुबा व्यवसायिकाना प्रवाळ हाताळण्याचे प्रशिक्षण द्यावे, अभयारण्यामुळे स्थानिक मच्छीमारी व पर्यटन व्यवसाय यांच्यावर काही निर्बंध येणार का? याची माहिती शासनाने द्यावी अशी मागणी बाबा मोंडकर यांनी यावेळी केली.
मात्र, सदर मसुद्याची कार्यवाही थेट वरिष्ठ पातळीवरून नेमलेल्या समितीकडून झाली असल्याने पर्यटन व्यवसायिकानी आपल्या मागण्या लेखी स्वरूपात सादर केल्यास त्या वरिष्ठांकडे पाठविण्यात येतील असे जिल्हा समन्वयक रोहित सावंत यांनी सांगितले. त्यानुसार पर्यटन व्यवसायिकाकडून निवेदन सादर करण्यात आले.
