खऱ्या आरोपी पर्यंत तपास न जाण्यासाठी राऊत यांचा राणेंवर आरोप

निलेश राणे: कोणालातरी वाचविण्याचा राऊत यांचा प्रयत्न असल्याचेही केला आरोप

ओरोस ता.१३-: पत्रकार शशिकांत वारीशे अपघात प्रकरणी राज्य शासनाने एसआयटी नियुक्त केली आहे. एसआयटी तपासा दरम्यान खऱ्या गुन्हेगारा पर्यंत पोहोचू नये, यासाठी खा विनायक राऊत हे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे ते या प्रकरणी राणे कुटुंबावर आरोप करीत आहेत. यातून त्यांना कोणाला तरी वाचवायचे आहे, असा आरोप भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केला आहे.


सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या खा विनायक राऊत यांनी विविध कार्यक्रमा दरम्यान पत्रकार शशिकांत वारीशे हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी हा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा असल्याचा सातत्याने आरोप केला होता. त्याला निलेश राणे यांनी आज उत्तर दिले आहे. पुढे बोलताना राणे यांनी, पत्रकार वारीशे अपघाती मृत्यू प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, खा राऊत आपल्या भाषणात सातत्याने ही माणसे राणे यांची असल्याचे सांगत आहेत. या प्रकरणी आमच्या कुटुंबाचा सबंध जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना प्रत्येक वेळी राणे दिसतात. राणे एके राणे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. याच्या पलीकडे त्यांना काय येत नाही. खासदाराचे काम काय आहे ? हे त्यांना माहीत नाही. साडे आठ वर्षात कोकणातील एक प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे लक्ष विचलित करुण सहानुभूती मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही राणे यांनी यावेळी केला.

You cannot copy content of this page