⚡कणकवली ता.०९-: सर्वसामान्य माणसे संभ्रमित होऊन जगत असताना एखादा लेखक वास्तव मांडतो आणि त्याला जेव्हा समजाकडून प्रोत्साहन मिळतं ती खरी ऊर्जा असते. समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या मांडण्यासाठी मी लेखन करतो.त्याला मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार म्हणजे मुकेपणाने जगणाऱ्या साऱ्या माणसांचा सन्मान आहे. असे उद्गार साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रवीण बांदेकर यांनी काढले.
कणकवली येथे अखंड लोकमंच आणि कणकवली नगरपंचायत यांच्या आयुक्त विद्यमाने आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमात बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप यांच्या हस्ते प्रवीण बांदेकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, अखंड लोकमंचचे नामानंद मोडक,कवी सामाजिक कार्यकर्ते श्री परब,नाटककार सफाअत खानप्रा.गोविंद काजरेकर,संपादक प्रभाकर ढगे,प्रा. डॉ.शरयू आसोलके,कवी, डॉक्टर अनिल ठाकूर कांबळे,साहित्यिक वीरधवल परब, प्रा.मोहन कुभार, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कणकवलीत झालेला सत्कार हा संपूर्ण जिल्हावासीयांनी केलेला सत्कार आहे. माझ्या साहित्यिक होण्याच्या वाटचालीत महत्त्वाचा वाटा असणाऱ्या साहित्यिक मित्र सिद्धार्थ तांबे यांची आज आठवण येते.असे म्हणत बांदेकर यांनी आठवणी जागविल्या. आपण जर कोणतेही काम निष्ठापूर्वक, प्रामाणिकपणे करत असू तर कोणीच आपल्याला अडवू शकत नाही. या सन्मानामुळे माझी जबाबदारी वाढली असून ती मी पार पाडायचा पुरेपूर प्रयत्न करेन, असे प्रवीण बांदेकर म्हणाले.
विकासाच्या अनेक भूलथापांना भुलून आपलं भविष्य अंधारात ढकलत असणाऱ्या सर्वसामान्य माणसांना विचार करण्यासाठी प्रवीण बांदेकर यांसारख्या लेखकांची आवश्यकता आहे. कोकणाला समृद्ध राजकीय, साहित्यिक, ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सध्या सगळीकडे माणुसकी उकरून काढणारी अनेक गिधाडं फिरत आहेत. त्यांना रोखण्यासाठी प्रवीण बांदेकर यांसारख्या लेखकांची गरज आहे, असे माजी केंद्रीय मंत्री ॲड.रमाकांत खलप म्हणाले.
प्रभाकर ढगे यांनी साहित्यिकांचे समाजबद्दलचे योगदान काय आहे, याविषयी मत मांडले. समाजाच्या सृजनासाठी समाजाला अस्वस्थ करण्यासाठी जो लिहितो, अशा लेखकांच्या मांदियाळीत प्रवीण बांदेकर यांचे नाव आहे अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.
प्रवीण बांदेकर यांच्याकडे ज्ञानपीठ पुरस्कारापर्यंत जाण्याची क्षमता आहे, असे म्हणत प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांनी शुभेच्छा दिल्या. प्रवीण बांदेकर यांच्या साहित्याचा आवाका खूप मोठा आहे, असे सांगत नाट्यलेखक शआफत खान यांनी शुभेच्छा दिल्या.
‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ मध्ये आधुनिक हिंसक राष्ट्रवादाचे चित्रण केले असल्याचे प्रा.गोविंद काजरेकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. प्रा. मोहन कुंभार यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. यावेळी दर्पण प्रबोधिनी, कणकवली नगरपंचायत, नगरवाचनालय व आमदार वैभव नाईक, गटनेते सुशांत नाईक यांच्या वतीने प्रवीण बांदेकर यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी अखंडचे अध्यक्ष नामानंद मोडक,संतोष राऊळ,विनायक सापळे, कल्पना मलये,शैला कदम यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
लेखक प्रवीण बांदेकर यांचा अखंड लोकमंच व कणकवली नगरपंचायतच्यावतीने नागरी सत्कार
