⚡कणकवली ता.०५-: प. पू. संत शिरोमणी रविदास महाराज यांचे आचार व विचार सर्वसमावेशक असून ते प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत. सिंधुदुर्गातील चर्मकार समाज बांधवांचे ओरोस येथे समाजभवन उभारण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी आपण १० लाखांची मदत दिली असून यापुढेही सर्व प्रकारचे माझ्याकडून सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज बांधवांच्यावतीने उबाळे मेडिकल समोरील उड्डाणपुलाखालील जागेत संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी नाईक बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक ॲड. विराज भोसले, कुडाळचे गटविकास अधिकारी तथा संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्सव कृती समितीचे प्रमुख विजय चव्हाण, सुजीत जाधव, चंद्रसेन पाताडे, विठ्ठल चव्हाण, अंकुश चव्हाण, अनिल जाधव, सी. आर. चव्हाण, आनंद जाधव, मानसी चव्हाण, मयुरी चव्हाण, प्रा. डॉ. सोमनाथ कदम, नंदन वेंगुर्लेकर, अॅड. अनिल निरवडेकर, प्रकाश वाघेरकर, डॉ. प्रदीप बांबार्डेकर, भारत पेंडुरकर, प्रसाद मसुरकर, नामदेव जाधव, संजय कदम, पंढरी चव्हाण, महानंदा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
समीर नलावडे म्हणाले, चर्मकार समाजबांधवांतर्फे संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्याचा उपक्रम स्तुत्य असून यानिमित्ताने समाजबांधवांची एकी दिसून आली. कणकवलीत चर्मकार बांधवांचे समाजभवन उभे राहावे, यासाठी आपण प्रयत्नशील असून शहरातील समाजबांधवांचे प्रश्न व समस्या त्वरित मार्गी लावण्याचे काम आपण करू. विजय चव्हाण म्हणाले, समाजाच्या उन्नती व उत्कर्षासाठी बांधवांनी आपापसातील मतभेद, हेवेदावे विसरून एकसंघ होणे ही काळाची गरज बनली आहे. आपल्या समाजाचे भवन उभे राहण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा.
ॲड. विराज भोसले म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्मकार बांधव विखुलेला आहे. त्यांना एकत्र आण्यासाठी तुम्ही आम्ही पुढाकार घेतला पाहिजे. समाजबांधवांनी संघटित होऊन आपल्या समाजाची एकजुटीची ताकद दाखवली पाहिजे. आप समाजभवन बांधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपल्या समाजाचे समाजमंदिर कणकवलीत सर्वांच्या सहकार्यातून बांधण्यासाठी प्रयत्न करूया.
यावेळी नंदन वेंगुर्लेकर, ॲड. अनिल निरवडेकर, सुजित जाधव यांच्यासह अन्य मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. आरंभी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन करून त्यांना अभिवादन केले. भारत पेंडूरकर यांनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक आनंद जाधव यांनी सूत्रसंचालन प्रसाद मसुरकर व चंद्रसेन पाताडे यांनी केले. आभार मंगेश आरेकर यांनी मानले.
यावेळी मोठ्या संख्येने चर्मकार बांधव उपस्थित होते. सकाळाच्या सत्रात प. पू. संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातून ढोल ताशांच्या गजरात समाजबांधवांनी शोभायात्रा काढली या यात्रेत संदेश पारकर, सुशांत नाईक यांनी सहभाग दर्शविला. दुपारच्या सत्रात प्रा. सोमनाथ कदम यांचे व्याख्यान झाले.
