महाराष्ट्र व गोवा राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान ; आज वाढदिवसाला येणार हजारो भाविक
⚡सावंतवाडी ता.०२-: हाकेशब्दाला धावणारा…नवसाला पावणारा… असा सावंतवाडीचा श्री देव उपरलकर. महाराष्ट्र व गोवा राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सावंतवाडी शहराचे हे जागृत देवस्थान. 365 खेड्यांचा अधिपती म्हणून हे देवस्थान ओळखले जाते, अशा या जागृत देवस्थानची महती सांगणारा ‘ग्लोबल महाराष्ट्र’चा धावता आढावा…
३६५ खेडेगावांचा मालक व रक्षणकर्ता म्हणून श्री देव उपरलकर देवस्थानची ओळख आहे. सावंतवाडी संस्थानच्या राजेमहाराजांचे देव उपरलकर श्रद्धास्थान होते. त्यानंतरही आजतागायत या देवस्थानची ओळख नवसाला पावणारा किंवा रक्षण करणारा देव म्हणूनच आहे. देवस्थानची ओळख सर्वदूर असल्याने या मार्गाने जाणारे वाहनचालक देवाला नतमस्तक होऊनच पुढे जातात. दर रविवार व बुधवारी याठिकाणी शहरातील लोक या आवर्जून उपस्थित राहतात.
हे शहर म्हणजे पूर्वीची सुंदरवाडी. सावंतवाडी संस्थानच्या भोसले घराण्यानं ओटवणे गावातून चराठा गावाच्या वाडीला म्हणजेच आजच्या सावंतवाडीला आपला दरबार हलविला होता. देवात शिवशंकराचा अंश असल्याची कथाही सांगितली जाते. या देवस्थानच्या श्रद्धेमुळे अनेक भाविकांचे रक्षण झाल्याच्या कथा आहेत. नरेंद्र डोंगर इथं असलेली राजधानी मोती तलावाकाठी वसविण्याच्यावेळी ४ सीमारक्षकांची नेमणूक राजघराण्यानं केली. उपकरकर, माठेवाडयातील दिंडीकर, सालईवाड्यातील काजरेकर आणि गरडीतील हेळेकर हे चार सीमारक्षक उपरलकर शंकराच्या आद्यदेवतांचा अंश मानले जातात. श्री देव उपरलकर देवाकडे ३६५ खेड्यातील चाळे सुपूर्द आहेत. ३६५ खेड्यातून त्यावेळचे दांडेकर व प्रमुख गावकरी मंडळी बकरा अगर कोंबड्यांचा सांगड, नारळ, विडा घेऊन वाजतगाजत येत. त्यावेळच्या राजांच्या हस्ते या देवकार्याचा सोहळा होत असे. प्राणीबळी देण्याची ही पद्धत रामराजा, पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांनी बंद केली अशी एक माहिती दिली जाते.
सावंतवाडी संस्थानांवर गनिमांचा हल्ला झाला होता. संस्थानची गनिमाला प्रतिरोध करण्याची तयारी नव्हती. त्यावेळी संस्थानचे तत्कालीन राजेसाहेब देवपूजेसाठी श्री देव पाटेकरांकडे बसले होते. देवपूजे दरम्यान, सेनापती दळवी यांनी गनिमांच्या चढाईची हकीकत राजांच्या कानी घातली.
राजेसाहेबांनी सेनापती दळवींच्या हाती नारळ दिला व उपरलकराकडे गाऱ्हाणे घालून नारळ फोडण्यास सांगितला. सेनापतींनी तसे करताच गांधीलमाशांचे मोहोळच्या मोहोळ उठून त्यांनी शत्रूशी दाणादाण उडवून दिली. हल्यात घायाळ झालेल्या सैन्याला आल्या पावली मागं परतावं लागल
श्री देव उपरलकर देवाच्या कृपेने त्याकाळी सैन्य पळविण्यात राजे यशस्वी झाले. त्यावेळी ओटवणे येथे कौलप्रसाद घेतला असता श्री देव उपरलकर यांनी मी या संस्थानातून जाणार नाही असे सांगितले. तेव्हा संस्थानच्या ३६५ खेड्यांचा मालक म्हणून जबाबदारी उपरलकर देवाने घेतली अशी आख्यायिका आहे.
या देवस्थानशेजारी एक तळी म्हणजेच विहीर आहे. या देवस्थानच्या जवळ उपरलकर स्मशानभूमी आहे. तेथे मृत व्यक्तीस अग्नी दिल्यानंतर क्रियाकर्म केले जायचे. त्या काळात पाणी पिणे अवघड होते. म्हणून वनखात्यात नोकरीला असणारा आप्पा भेंडे यांनी ही तळी बांधली. त्याच शेजारी पत्नी काशीबाई स्मरणार्थ दिवाकर रामचंद्र भेंडे कट्टा पेंडूर शके १८१४ मध्ये तळी बांधल्याचा एका खांबावर उल्लेख आहे.
सन १९९२ मध्ये दत्त उपासक प्रभाकर रामचंद्र मसुरकर यांनी तळीचे दुरुस्तीचे काम केले. प्रभाकर मसुरकर हे दत्तभक्त होते. पहाटे श्री देव उपरलकरान त्यांना स्वप्नात दृष्ठांत दिला. त्यानंतर या मूर्तीची स्थापना करण्यात आली. मूर्तिकार दादा चव्हाण यांनी हि मूर्ती बांधली. उपरलकराची श्रद्धा एवढी मोठी आहे की राजकारणी मंडळी, सिनेकलाकार राज्यभरातील भक्तगण नतमस्तक होण्यासाठी सावंतवाडीत येतात. श्री देव उपरलकर देवस्थानाची आख्यायिका जेवढी मोठी आहे त्यापेक्षाही हाकेशब्दाला धावणारा… नवसाला पावणारा देव म्हणून त्याची ओळख आहे. सावंतवाडी-आंबोली मार्गावर शहरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर हे देवस्थान असून सावंतवाडीवासियांची या देवस्थानाविषयी अपार श्रद्धा आहे. वार्षिक उत्सवदिनी गोवा, कर्नाटकसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने इथं येऊन श्री देव उपरलकर चरणी लीन होतात.
