⚡कणकवली ता.१५-: आपल्या नजरेसमोर ध्येय्य नाही तोपर्यंत पाहिजे तसे घडू शकत नाही. ध्येय्य मोठे ठेवले पाहिजे तरच आपले यशही तेवढेच मोठे असेल. त्यासाठी सकारात्मक दृष्टीने काम करा, यश तुमचेच आहे, असे प्रतिपादन माइंड ट्रेनर सदाशिव पांचाळ यांनी तळेरे येथे केले.
स्व. सुनिल तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि वाचनालयाने 10 वी व 12 वीच्या मुलांसाठी आयोजित केलेल्या “परिक्षेपूर्वीची मानसिक तयारी” या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, प्रा. हेमंत महाडीक, प्रा. नितेश गुरव, सतिश मदभावे, उदय दुदवडकर, श्रावणी मदभावे आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. हेमंत महाडीक यांच्याहस्ते सरपंच हनुमंत तळेकर यांचा तर ट्रस्ट व वाचनालयाच्या वतीने सदाशिव पांचाळ यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पांचाळ म्हणाले की, एखादी गोष्ट ठरवली की, त्यामध्ये सातत्य पाहिजे. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले की, आपल्याला पाहिजे ते घडू शकते. आयुष्यात काय बनायचे आहे, त्याचे निश्चीत टारगेट ठेऊन काम करा तरच आयुष्य आनंदी होईल. विचार बदला म्हणजे ॲटीट्यूड बदलेल. ते केल्याने कृती बदलेल आणि कृती बदलली की आपोआप बदल होईल. त्यासाठी धेय्य समोर ठेऊन सातत्याने काम करत राहिले पाहिजे, असल्याचे मत पांचाळ यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार श्रावणी मदभावे यांनी, मान्यवरांची ओळख प्रा. नितेश गुरव केली.
