डॉ.दिलीप पटवर्धन ;जीवनविद्या मिशन कणकवली प्रबोधन महोत्सव उत्साहात
⚡कणकवली ता.१४-: जीवन जगणे हि एक कला आहे. इतर कला जशा तज्ञ व्यक्ति कडून शिकवून घेतल्याशिवाय आत्मसात करता येत नाही तशीच, सुखी समृद्ध, यशस्वी आनंदी जीवन जगण्यासाठी आपण खूप काही करतो परंतु जे करायला पाहिजे तेच करत नाही. ‘ते’ नेमके काय करायचे हे जे सांगतात त्यांनाच सद्गुरू म्हणतात. माणसाचा जन्म कशासाठी? याचे जीवनविदेने दिलेले उत्तर म्हणजे ‘आनंद वाटत वाटत आनंद आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे असे प्रतिपादन डॉ. दिलीप पटवर्धन यांनी केले.
सद्गुरू श्री. वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त संपूर्ण महाराष्ट्र भर विविध समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कणकवली शहरामध्ये गेला आठवडाभर घर तिथे जीवनविद्या, प्रार्थना जपयज्ञ, ग्रंथसंपदा पोहचविण्याचे कार्य जीवनविद्या मिशनचे स्वयंसेवक नामधारक करत आहेत.
या प्रबोधन महोत्सवाची सांगता डॉ. दिलीप पटवर्धन यांच्या प्रबोधनाने करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर व्यापारी संघाचे अध्यक्ष दिपक बेलवलकर, डॉ. फर्टीनिटी क्लब सिंधुदुर्गचे माजी अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. फर्टीनिटी क्लब सिंधुदुर्गचे सेक्रेटरी डॉ. सुहास पावसकर, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, एस. एम कॉलेजचे प्राचार्य वायंगणकर , प्रा. हरिभाऊ भिसे , सरपंच आनंद ठाकूर, डॉ. म्हाडेश्वर, डॉ. बिरमोळे, मुख्याध्यापक राजेंद्र राठोड, निलेश कदम, सागर महाडिक, योगेश ढवन, सुनिल पालव, कृष्णा म्हसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दैनंदिन जीवनामध्ये अतिशय साध्या सोप्या गोष्टींचे पालन आपण जर केले तरी आपल्याला कौटुंबिक सौख्य, ऑफिस कंपनी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळून आपण यशस्वी, तणावपूर्वक जीवन जगू शकतो. आई-वडील, पत्नी, मुले, सहकाऱ्यांशी प्रेमाने वागणे, त्यांचे कौतुक करणे, एकमेकांना मदत-सहकार्य करणे, सुखदुखात सहभागी होणे. हे सर्व इंटरनेटच्या जमान्यात आपणा विसरून गेलो आहोत. जे इतरांना द्याल तेच तुमच्याकडे परत येईल. सुख द्या सुख मिळेल. आनंद द्या आनंद मिळेल. दुख, त्रास, इतरांचे नुकसान कराल, अहित चिंताल तरी ते सहस्त्र पटीने परत येईल. म्हणून विचारांच्या ठिकाणी सावध रहा, कारण विचार हाच देव आहे. मोठा विचार करा, सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करा. सुखी जीवनासाठी अशा अनेक टिप्स त्यांनी हसत-खेळत दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन संदीप परब यांनी केले.
