रामचंद्र वालावलकर यांना कथामालेचा सेवामयी शिक्षक पुरस्कार प्रदान…

⚡सावंतवाडी ता.११-: “साने गुरुजी कथामाला हे गुरुजींच्या विचाराने मंतरून गेलेलं एक झाड आहे. कथामालेचे व्रत शिक्षकांकडून एकदा स्वीकारले गेले की विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकासाचे अनेक उपक्रम शिक्षकांच्या हातून उत्साहाने घडत जातात,” असे उद्गार श्री. रामचंद्र आंगणे, उपशिक्षणाधिकारी जि. प. सिंधुदुर्ग यांनी साने गुरुजी कथामाला मालवणच्या ‘सेवामयी शिक्षक पुरस्कार’ वितरण सोहळ्याच्या प्रसंगी काढले.

माडखोल, सावंतवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. रामचंद्र वालावलकर यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवणचा कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार नुकताच माडखोल केंद्रशाळेत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानचिन्ह, मानपत्र आणि रोख पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कल्पना बोडके, गटशिक्षणाधिकारी सावंतवाडी, विठ्ठल कदम, साहित्यिक, विजय राऊळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, श्रुती राऊळ, सरपंच माडखोल, जी. जी. राऊळ, उपसरपंच माडखोल, सुरेश गावकर, प्रकाश पेडणेकर, सुगंधा गुरव आणि मालवण कथामालेचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना कल्पना बोडके म्हणाल्या, “आज मालवण कथामालेच्या वतीने माझ्या सावंतवाडी गटातील केंद्रप्रमुख श्री. रामचंद्र वालावलकर यांचा आपण जो सत्कार केलात, त्याबद्दल मी आपली आभारी आहे. वालावलकर सरांमधील शिक्षकी सेवा मी नेहमी पाहत आहे. त्यांनी माडखोल मध्ये सुरू केलेला कथामालेचा उपक्रम मी संपूर्ण तालुक्यात राबवण्याचा प्रयत्न करीन.” यावेळी श्रीमती बोडके यांच्या हस्ते वालावलकर यांच्या सुविद्य पत्नी सौ.राजश्री वालावलकर यांचा कथामालेच्या वतीने शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. वालावलकर यांच्या विषयी बोलताना बालसाहित्यिक विठ्ठल कदम म्हणाले, “वालावलकर यांनी तीन दशके कथामालेचे काम निरलस सेवेने केले आहे. त्याग व सेवा यांचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रामचंद्र वालावलकर यांचे कथामाला कार्य होय.”
सत्काराला उत्तर देताना रामचंद्र वालावलकर म्हणाले, “माझ्या जीवनाची जडणघडण साने गुरुजी कथामालेच्या परिवाराने केली. आज त्याच परिवाराचा शिक्षणतज्ज्ञ कै.जी.टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार मला प्राप्त होताना मला जे समाधान लाभले, त्याचे कथन मी शब्दात करू शकत नाही.”
यावेळी तेथे उपस्थित कथामालेचे पूर्वाश्रमीचे सेवामयी पुरस्कार विजेते परशुराम गुरव, गुरुनाथ ताम्हणकर, श्रुती गोगटे, हृदयनाथ गावडे, रश्मी आंगणे यांचा प्रकाश पेडणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षणतज्ज्ञ कै. जी.टी. गावकर यांच्या विषयी सुरेश गावकर यांनी माहिती कथन केली. जी.टी. गावकर प्रतिमापूजन मोहनराव गावकर, कोल्हापूर यांनी केले. याप्रसंगी सदानंद कांबळी, नवनाथ भोळे, कामिनी ढेकणे, पांडुरंग कोचरेकर, सय्यद मुश्ताक, स्मिता जोशी, चंद्रशेखर हडप आदी कथामाला कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. तर माडखोल केंद्रातून मुख्याध्यापिका विशुदा आजगावकर, ज्योती शिरोडकर, उमा तावडे, ऐश्वर्या पोकळे, दीपक पंडित, दत्ताराम सावंत, प्रवीण ठाकूर, अरुण म्हाडगूत, रश्मी सावंत, रोशन राऊळ, संजय बांबुळकर, सुरेश वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी सर्वांचे स्वागत पांडुरंग कोचरेकर, सुगंधा गुरव यांनी केले. तर आभार प्रदर्शन महादेव बागडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र कुबल यांनी केले. मनाली फाटक यांच्या शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

You cannot copy content of this page