रामचंद्र देवळी यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी
*💫सावंतवाडी दि.११-:* मळगाव बॉक्सवेल येथील राज्यमार्गावर अपघातांची संख्या वाढून जनतेच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने याबाबत योग्य उपाययोजना करा, अशी मागणी मळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र सदाशिव देवळी यांनी सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात त्यांनी म्हटले की, मळगाव येथील बॉक्सवेल जवळ सावंतवाडी ते आरोंदा या राज्यमार्गावर नियमित अपघात होत असतात. या अपघातात वाहनधारकांना गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून भविष्यात गंभीर अपघात होऊन जीवितहानी होऊ नये यासाठी गतिरोधकांची संख्या वाढविणे, तसेच रॅम्बलर ट्रीप घालणे व बहिर्वक्र आरसे लावण्यासंदर्भात येत्या १५ दिवसांत कार्यवाही करावी, अन्यथा ग्रामस्थांसहीत अर्धनग्न उपोषण छेडण्यात येईल, असा इशाराही देवळी यांनी दिला आहे वारंवार वृत्तपत्र तसेच इतर मार्गाने मागणी करूनही कार्यवाही न झाल्याने त्यांनी याबाबत नाराजीही व्यक्त केली
