⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: जिल्ह्यातील ‘चला जाणूया नदीला’ या अभियांनातर्गत सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील कडशी नदीच्या काठावर वसलेल्या मोरगाव, पडवे माजगाव, आडाळी, डिंगणे, डोंगरपाल व नेतर्डे या सहा गावांमध्ये ‘कडशी नदी संवाद यात्रेचे’ आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गो. ह. श्रीमंगले यांनी दिली आहे.
कडशी नदी संवाद यात्रा कार्यक्रम पुढीलप्रमाणे - मोरगाव येथे दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत आणि पडवे- माजगाव येथे दुपारी 12 ते 1 या वेळेत. आडाळी येथे दि.29 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत आणि डिंगणे येथे दुपारी 12 ते 1 या वेळेत. डोंगरपाल दि. 30 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत आणि नेतर्डे दुपारी 12 ते 1 या वेळीत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
संवाद यात्रेची उद्दिष्टे नदी संवाद अभियानाचे आयोजन करणे. जनसामांन्यांना नदीसाक्षर करण्याबाबत उपाययोजना आखणे. नागरिकांच्या सहकार्याने नदींचा सर्वंकष अभ्यास करणे व त्याबाबतचा प्रचार व प्रसार करणे. अमृत वाहिनी बनविण्यासाठी मसुदा तयार करणे. नदीचे स्वास्थ आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार व प्रसार रुपरेषा आखणे. नदीचा तट, प्रवाह जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रचार प्रसार बाबत नियोजन करणे. नदी खोऱ्यांचे नकाशे, नदीची पूर रेषा, पाणलोट क्षेत्राचे नकाशे, मातीचे पहरिक्षण, पर्जन्याच्या नोंदी, मागील पाच वर्षातील पूर आणि दुष्काळाच्या नोंदी या बाबतची माहिती संकलित करणे. पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजल स्तर उंचावणे, जनजागृती करणे. अतिक्रमण शोषण आणि प्रदूषण या तीन प्रमुख कारणांचा अभ्यास व त्याचा परिणाम अभ्यास करणे. नदी संवाद यात्रा आयोजित करण्याबाबत आराखडा तयार करुन अंमलबजावणी करणे. नदी समाज आणि शासन यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करणे असा आहे.
