⚡बांदा ता.२४-: “आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या संदेशांना प्रतिसाद देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक टाळावे आणि वैयक्तिक तसेच बँक खात्याशी संबंधित माहिती कोणालाही देऊ नये. सायबर फसवणुकीचा बळी ठरल्यास तातडीने १९३० हेल्पलाइन किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,” असे आवाहन बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. बी. पालकर यांनी येथे केले.
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने बांदा पोलीस ठाण्याच्या वतीने दिव्य ज्योती इंग्लिश मिडीयम स्कूल, डेगवे येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक पालकर यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमास अकॅडेमी ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशनचे संचालक मनोज मालवणकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमास दिव्यज्योती प्रशाळेचे इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी श्री मालवणकर यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे बदलते स्वरूप, ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, सायबर बुलिंग, फेक लिंक, फिशिंग, ओटीपी व बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहितीची सुरक्षितता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
बांदा पोलीस निरीक्षक श्री पालकर यांनी आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर करताना योग्य खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमादरम्यान विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. मार्गदर्शन सत्र संवादात्मक व माहितीपूर्ण ठरले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होऊन डिजिटल माध्यमांचा सुरक्षित व जबाबदारीने वापर करण्याचा संदेश पोहोचला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस विभाग, अकॅडमी ऑफ कॉम्प्युटर एज्यूकेशन तसेच शाळा प्रशासन यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल व सुरक्षित डिजिटल भविष्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत प्रशाळेचे मुख्याध्यापक फादर रॉबिन, पालक वर्ग यांनी व्यक्त केले.
फोटो:-
डेगवे येथील दिव्य ज्योती प्रशालेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक डी बी पालकर.
सायबर फसवणुकीपासून सावध राहा; विद्यार्थ्यांना बांदा पोलिसांचे मार्गदर्शन…
