Headlines

कणकवली नगरपंचायतीत ‘एकल महिला दिवस’ उत्साहात साजरा…

विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा सन्मानपूर्वक स्वीकार:महिलांच्या समस्या, योजना व स्वावलंबनावर सविस्तर चर्चा..

कणकवली : संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेल्या २३ जून ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिना’निमित्त महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित राज्य एकल महिला धोरणाच्या अनुषंगाने कणकवली नगरपंचायत येथे ‘एकल महिला दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. ‘विधवा’ या शब्दाऐवजी ‘एकल महिला’ ही सन्मानजनक संज्ञा वापरत शहरातील महिलांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमात महिलांच्या समस्या, अडचणी, अपेक्षा तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर, मुख्याधिकारी गौरी पाटील, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेविका सुमेधा अंधारी, नगरसेवक जयेश धुमाळे, रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, लुकेश कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि शहरातील एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मार्गदर्शन करताना शासन व नगरपंचायतीच्या विविध योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले. एकल महिलांना सामाजिक, आर्थिक आणि मानसिक आधार देण्यासाठी शासन व स्थानिक स्वराज्य संस्था खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता महिलांच्या शाश्वत विकासासाठी पुढाकार घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी ‘विधवा’ ऐवजी ‘एकल महिला’ ही संज्ञा वापरण्याचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून संघटित होऊन कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. नगरपंचायतीच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी महिलांनी आपल्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन केले. संजय गांधी निराधार योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी नगरपंचायत कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP), बीज भांडवल योजना यांसारख्या रोजगाराभिमुख योजनांची माहिती दिली. महिला व बाल विकास विभाग, सखी वन स्टॉप सेंटर, महिला समुपदेशन केंद्र तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रतिनिधींनी महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना, कायदे आणि संरक्षणात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांच्या अडचणी, सूचना आणि निवेदने स्वीकारण्यात आली. त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले यांनी मानले.

You cannot copy content of this page