कामे न केल्यास २६ जानेवारीला उपोषण;मंदार केणी, तपस्वी मयेकर यांचा इशारा
मालवण, दि प्रतिनिधी
जिल्हा नियोजन मधून सुमारे ५० लाख रुपयांचा निधी शहरातील रस्त्यांच्या कारपेटच्या कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र वर्षभराचा कालावधी उलटून गेला तरी संबंधित ठेकेदाराने ही कामे केलेली नाहीत. त्यामुळे तत्काळ या कामास सुरुवात न झाल्यास येत्या २६ जानेवारीला पालिकेच्या बाहेर उपोषणास बसणार असल्याचा इशारा पालिकेचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी, तपस्वी मयेकर यांनी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना दिला आहे. या बाबतचे निवेदन आज त्यांना सादर करण्यात आले.
जिल्हा नियोजन मधून उपलब्ध झालेल्या ५० लाख रुपये निधीच्या माध्यमातून शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या कारपेटच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या. यात धुरीवाडा येथील खोतमठ रस्ता, रांगोळी महाराज रस्ता, वायरी गर्दे रोड रस्ता, वायरी हनुमान मंदिर रस्ता या कामांचा समावेश आहे. या कामांना कार्यारंभ आदेश देऊन वर्षभराचा कालावधी उलटला आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने अद्याप पर्यंत या कामाला सुरुवात केलेली नाही. या कामांना लवकरात लवकर सुरुवात व्हावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. मात्र संबंधित ठेकेदार वारंवार मुदतवाढ मागत आहे. तरी येत्या काही दिवसात संबंधित ठेकेदाराने या कामाला सुरुवात न केल्यास २६ जानेवारीला पालिकेच्या बाहेर उपोषणास बसण्याचा इशारा पालिकेचे माजी बांधकाम सभापती श्री. केणी, श्री. मयेकर यांनी दिला आहे.
