तब्बल पाच लाखांची रोकड, चांदीच्या वस्तू लंपास; पोलिसांसमोर आव्हान
⚡कणकवली ता.११-: कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील दत्तकृपा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले असून
एका फ्लॅटमधून तब्बल पाच लाखांची रोकड,चांदीच्या वस्तू लंपास करण्यात आल्या आहेत.
भरवस्तीत घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. कणकवली शहरात पुन्हा चोरटे सरसावले असल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील दत्तकृपा अपार्टमेंटमधील पाच दिवसांसाठीच बंद असलेले दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले. ही घटना रविवारी रात्री १ वा. सुमारास उघडकीस आली. फोडलेल्या फ्लॅटमध्ये निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश लक्ष्मण पवार (६५) यांच्या फ्लॅटचा समावेश आहे. त्यांच्या फ्लॅटमधून ५ लाख २० हजार रुपये रोकड व चांदीची दोन हजार रुपयांची समई चोरीस गेली. तर अन्य फ्लॅटचे मालक हरीश पुरोहीत हे बाहेरगावी असल्याने त्यांच्या फ्लॅटमधील चोरीस गेलेला मुद्देमाल समजू शकला नाही. घटनेची माहिती समजताच कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर खंडागळे, हवालदार आर. बी. नानचे यांनी रात्रीच घटनास्थळ गाठले. तर सकाळच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक व्ही. एम. चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे, कॉन्स्टेबल सचिन माने यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तत्पूर्वी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र , चोरट्यांचा मागमूस लागू शकला
नव्हता. मागील काही महिने शांत असलेले चोरटे भरवस्तीत पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने कणकवलीवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या चोरट्यानी केवळ दोनच फ्लॅट फोडले असल्याने चोरी करण्यापूर्वी चोरट्यानी अंदाज घेतला असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
