जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर;सामाजिक न्याय भवन येथे पत्रकार कार्यशाळा संपन्न
ओरोस ता.२९-:
माध्यमांशी संपर्क असलेल्या शासनाच्या कोणत्याही विभागाचा कारभार चांगला असतो. चुकी झाल्या तरी त्यात सुधारणा केल्या जातात. मात्र, सामाजिक न्याय भवन मधील अधिकारी, कर्मचारी संपर्कात राहत नाहीत. योजनांची माहिती देत नाहीत. या विभागाचा ग्रामीण भागात समन्वय नाही. येथील भौगोलिक परिस्थिती पाहता काही अटी शिथिल होण्याची गरज आहे. या अटी शिथिल करण्याची मानसिकता असलेला अधिकारी आवश्यक आहे. तरच समस्या राहणार नाहीत, असे प्रतिपादन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी केले.
२६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत समता पर्व हा उपक्रम समाज कल्याण विभागाच्यावतीने राबविला जात आहे. या अनुषंगाने “सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा” ही थीम निवडण्यात आली आहे. यासाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमाचा एक भाग म्हणून मंगळवारी सिंधुदुर्गनगरी येथील सामाजिक न्याय भवन येथे एक दिवसाची “पत्रकारांची कार्यशाळा” हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर, जात पडताळणी उपायुक्त प्रमोद जाधव, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकने, सहाय्यक लेखाधिकारी भालचंद्र कापडी, समाज कल्याण निरीक्षक अनिल बोरीकर, चित्रांगी तोरस्कर, सुनील बागुल, संतोष परुळेकर, धनलता चव्हाण, शिल्पा आंब्रे, सृष्टी रेवाळे, संग्राम कासले, आरती सावंत, संदेश कसालकर, धोंडी कलिंगड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आनंद करपे यांनी केले.
