कमलताई परुळेकर;जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रफुल्ल जाधव यांना प्रदान
⚡कणकवली ता.२९-: शिक्षण पुरस्कर्ते असलेल्या आपल्या वडिलांचा वारसा पवार भावंडे जोपासत आहेत ही अनुकरणीय बाब आहे. सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानच्या वतीने कोणत्याही शिफारशी आणि प्रस्तावाशिवाय शिक्षकांतील गुणवत्ता पारखून आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याची संकल्पना कौतुकास्पद आणि ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देणारी आहे. आजच्या धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांना सम्यक दृष्टी देण्याची जबाबदारी ही शिक्षकांची असल्याचे प्रतिपादन जेष्ठ समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर यांनी केले.
सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वैभववाडी तालुक्यातील प्रफुल्ल तुकाराम जाधव यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी “त्या” बोलत होत्या. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त प्राथमिक शिक्षक प्रफुल्ल जाधव यांना सपत्नीक मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम 5 हजार रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह , शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. कणकवली नगरवाचनालाय च्या सभागृहात कमलताई परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला व्यासपिठावर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, महाराष्ट्र केंद्रप्रमुख राज्य संघाचे उपाध्यक्ष संतोष जाधव, प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ.सतीश पवार, सचिव शुभांगी पवार उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना कमलताई म्हणाल्या की एकीकडे आजच्या इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात नेमकं खरे काय आणि खोटे काय ? याचा संभ्रम सर्वांच्याच मनात आहे. देशात राजकीय स्वार्थासाठी धर्म आणि जाती पंथाच्या नावाखाली समाजाचे ध्रुवीकरण सुरु आहे.अशा वेळी विद्यार्थ्यांना मानवता धर्माची शिकवण देणाऱ्या आदर्शवत काम करत असलेल्या शिक्षकांना हा पुरस्कार देणे म्हणजे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आहे. यावेळी मनोगत व्यक्त करताना उपशिक्षणाधिकारी आंगणे म्हणाले की आपल्या वडिलांचा वसा घेऊन दिवंगत सदाशिव पवार गुरुजी यांची मुले विविध क्षेत्रात काम करत आहेत.विद्यार्थ्यांच्या कलानुसार घेऊन त्यांना आपलेसे करत विद्याद्यानाचे काम करणे ही प्रफुल्ल जाधव यांची खुबी आहे. केवळ अध्यापनच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाने सदैव झटले पाहिजे. सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठान ने जिल्ह्यातील प्रसिद्धी पासून दूर असलेल्या परंतु खरोखर विद्यार्थी घडविण्यात आदर्शवत काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर पुरस्काराच्या माध्यमातून देत असलेली ही कौतुकाची थाप अखंड सुरू ठेवावी. केंद्रप्रमुख संघाचे राज्य उपाध्यक्ष संतोष जाधव म्हणाले की आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीसाठी प्रचलित पद्धतीला फाटा देत खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे आदर्श शिक्षक समाजासमोर आणता येतात हे सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानने दाखवून दिले आहे.
