सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ कदम यांचे प्रतिपादन
⚡ओरोस ता.२८-: भारत देश हा विविधतेत एकता असलेला देश आहे. भारतीय संविधानामुळे आपला भारत देश एकसंध आहे. त्यामुळे भारतीय संविधानातील मूल्यांची जोपासना करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ कदम यांनी सामाजिक न्याय भवन ओरोस येथे बोलताना केले.
संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय विभाग व बार्टी यांच्यावतीने राज्यात समता पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत समाजिक न्याय भवन येथे `भारतीय संविधान’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विश्वनाथ कदम हे बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा जात पडताळणी समिती सिंधुदुर्गचे उपायुक्त प्रमोद जाधव, सहाय्यक लेखाधिकारी भालचंद्र कापडी, समाजकल्याण निरीक्षक अनिल बोरीकर, बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम, चित्रांगी तोरसकर, सुनील बागुल, संतोष परूळेकर, धनलता चव्हाण, शिल्पा अमरे, सृष्टी रेवाळे, आरती सावंत, संदेश कसालकर, धोंडी कलिंगण, नैतिक वाघाटे तसेच समाजकल्याण व जात पडताळणी समितीचे अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जातपडताळणी उपायुक्त प्रमोद जाधव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी विश्वनाथ कदम यांनी भारतीय संविधान निर्मितीची पाशर्वभूमीचा आढावा घेतला तसेच संविधानाच्या वैशिष्टय़ाबाबत सविस्तर विवेचन केले. जात पडताळणीचे उपायुक्त प्रमोद जाधव यांनी भारतीय संविधानातील मूल्ये, तत्वे याविषयी मार्गदर्शन केले. बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेबाबत विवेचन केले तसेच समतादूत प्रकल्पाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल बोरीकर यांनी केले.
