मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळविणार मान्यता;ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे आश्वासन
मालवण (प्रतिनिधी)
मालवणातील पर्यटन विकासासाठी, येथील मासेमारीच्या प्रगतीसाठी आपणच प्रथम प्रयत्न केले होते. मात्र आज मालवणातील पर्यटनात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येतो. येथील बंदरांचा, बचत गटांचा अपेक्षित विकास झालेला नाही. येथील पर्यटन विकासाबाबत आपण तयार केलेला आराखडा तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना सादर केला होता, मात्र तो त्यांनी कचरापेटीत टाकला की काय ते माहीत नाही. मात्र आता लवकरच बैठक घेऊन मालवणसाठी ठोस पर्यटन विकास आराखडा तयार करून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारसमोर सादर करून त्यास मान्यता मिळवून घेऊ असे प्रतिपादन माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले.
मालवणात बाळासाहेबांची शिवसेना मालवण कार्यलयाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत हे बोलत होते. यावेळी उद्योजक किरण सामंत, संजय आंग्रे, बबन शिंदे, महेश राणे, राजा गावकर, किसन मांजरेकर, विश्वास गावकर आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी सुधीर सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पर्यटन विकासासाठी आपण प्रयत्न केले होते. मात्र आता याबाबत अपेक्षित काम होत नाहीय. सिंधुदुर्ग किल्ला ही जगातील सुंदर वस्तू असून त्याच्या विकासासाठी प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. मालवणात श्रीमंत व भरपूर खर्च करणारा पर्यटक आला पाहिजे. त्यासाठी मूलभूत व आवश्यक सेवा सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. गोव्याचे पर्यटन हे ड्रग पर्यटन बनले आहे, तर सिंधुदुर्गातील पर्यटन हे सुसंस्कृत पर्यटकांचे आहे. निवास योजना व इतर सुविधा निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. पर्यटन विकासाबाबतचे आराखडे यामागील सरकारांना सादर केले, मात्र तत्कालीन सरकारे त्याबाबतची कार्यवाही टाळत गेले. आदित्य ठाकरे यांनाही आराखडा सादर केला होता. याबाबत पर्यटनातील मंडळींची लवकरच बैठक घेऊन ठोस पर्यटन विकास आराखडा आपण तयार करून राज्य सरकारला सादर करणार आहोत सावंत म्हणाले.
मालवणातील बंदरांचा देखील अपेक्षित विकास झालेला नसून अद्यावत मासेमारी बंदर व प्रवासी बंदर म्हणून बंदरे विकसित झाली पाहिजेत. मूलभूत सोयी सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. येथील ग्रामीण भागातील महिलांचे बचत गट निर्माण करण्याची मोहीम सुरू करावी लागेल, उद्योग व रोजगार निर्माण करण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागतील असेही सावंत म्हणाले. तसेच आपण खासदार असताना मालवणात एनसीडीसी योजनेअंतर्गत १५ ट्रॉलर्स दिले होते. मात्र ती आपण चुक केली होती असे आता वाटत आहे. आता मासे कमी मिळू लागले आहेत. विविध प्रकारच्या मच्छीमारांना त्यांचे कार्यक्षेत्र वाटून दिले पाहिजे. एलईडी सारखी मासेमारी ही माशांचा खून करण्यासारखीच आहे, माशांचे संवर्धन होणे गरजेचे आहे, त्यासाठी मच्छीमारांनी पुढे आले पाहिजे, याबाबतही राज्य सरकारच्या सहकार्याने आपण ठोस कार्यक्रम राबविणार आहोत.
दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना गटाची मालवण तालुका कार्यकारिणी आठवडाभरात जाहीर करण्यात येईल असेही यावेळी सुधीर सावंत यांनी स्पष्ट केले.
चिपी विमानतळावर सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्नशील : किरण सामंत
चिपी विमानतळावर विमान सेवा कशी वाढेल यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पावले उचलली आहेत. चिपी विमानतळावर सेवा सुविधा, विमानांच्या अधिक फेऱ्या, नाईट लँडिंग वाढल्यास विमानतळाची कार्यक्षमता वाढेल, यासाठी आमदार नितेश राणे यांनीही केंद्रीय मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांच्याकडे मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, दीपक केसरकर हे ही प्रयत्नशील असून चिपी विमानतळावर सुविधा वाढवल्या जातील, असा विश्वास किरण सामंत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.