सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाचे आयोजन
⚡मालवण ता.२५-: नरकचतुर्दशीच्या निमित्ताने मालवणात सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने प्रथमच आयोजित केलेल्या इकोफ्रेंडली नरकासुर स्पर्धेला शहरातील नरकासुर साकारणाऱ्या विविध बालगोपाळ व तरुण मित्रमंडळांचा उदंड प्रतिसाद लाभला. भरड तारकर्ली नाक्यावर आयोजित या स्पर्धेला रसिकांची तुफान गर्दी झाली होती तर स्पर्धेत सहभागी झालेल्या आकर्षक नरकासुर प्रतिकृती लक्षवेधी ठरल्या. या स्पर्धेत खुल्या गटात यंगस्टार बॉईज शिवजयंती उत्सव मंडळ वायरी तर लहान मुलांच्या गटात वरद सापळे याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.
दरम्यान, स्पर्धक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून पूढील वर्षी इको फ्रेंडली धर्तीवरच अधिक भव्य दिव्य प्रमाणात स्पर्धा घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्य आयोजक सौरभ ताम्हणकर यांनी केली .
दिवाळीत नरक चतुर्दशी निमित्त मालवणात दरवर्षी भव्य अशा नरकासुर प्रतिकृती तयार करून त्यांचे दहन केले जाते. या पार्श्वभूमीवर मालवण मध्ये भाजपचे स्थानिक युवा नेते तथा युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने प्रथमच इको फ्रेंडली धर्तीवर नरकासुर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने रविवारी मध्यरात्री मालवण मध्ये नरकासुर स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. अगदी १ फुटा पासून १५ फुटापर्यंतचे नरकासुर या स्पर्धेत साकारण्यात आले होते. पर्यावरणाचं संतुलन आज काळाची गरज बनली आहे. त्यामुळे प्लास्टिक, थर्माकोलचा वापर टाळून तयार केलेले नरकासुर यावेळी पाहायला मिळाले. काही मंडळानी देखाव्यासह हालते नरकासुर तयार केले होते. या स्पर्धेला मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून लहान गटात ९ तर खुल्या गटात १० मंडळानी सहभाग घेतला.
या स्पर्धेत मोठ्या गटात यंगस्टार बॉईज शिवजयंती उत्सव मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला. तर इस्वटी महापुरुष देऊळवाडा आडारी मंडळाने द्वितीय आणि बांगीवाडा मंडळाने तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्या मंडळांना अनुक्रमे ८८८८ /-, ४४४४/- आणि २२२२/- रुपये चषक देण्यात आला. तर लहान गटात वरद सापळे याने प्रथम आणि पार्थ नार्वेकर याने द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांना अनुक्रमे २२२२/., ११११/- रुपये आणि चषक देण्यात आला. लहान गटातील सर्व सहभागी मुलांना भेटवस्तू देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक संजय केळूसकर, मिरा पराडकर यांच्यासह प्रख्यात युट्यूबर अंकिता प्रभूवालावलकर आणि मंदार शेटये यांनी केले. सुत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सौरभ ताम्हणकर यांच्यासह राकेश सावंत, निशय पालेकर, चंद्रकांत मयेकर, ललित चव्हाण, फ्रान्सिस फर्नाडिस, जयेंद्र कळंगूटकर, तुषार वाघ, गौरव लुडबे, प्रशांत गवंडी, चिन्मय ढोलम, निनाद बादेकर, पंकज गावडे, राहुल हरचकर, शुभम लुडबे, मयू पारकर, निकीत वराडकर आदींनी परिश्रम घेतले.
गोव्या प्रमाणेच मालवण मध्ये मोठमोठे नरकासुर बनवले जातात. या कलेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आम्ही ही स्पर्धा आयोजित केली. आज पर्यावरण संवर्धन काळाची गरज बनली आहे. त्यामुळे इको फ्रेंडली नरकासुर स्पर्धा आयोजित करून पर्यावरणाचे संतुलन राखण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. याला मंडळानी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही मंडळानी आकर्षक नरकासुर बनवले होते. मात्र त्यामध्ये प्लास्टिक, फोम, थर्माकोलचा वापर असल्याने ते विजेते ठरले नाहीत. मात्र पुढील वर्षी ही स्पर्धा अधिक भव्य दिव्य स्वरूपात साकारताना सहभागी मंडळानी पर्यावरण पूरक साहित्य वापरून हे नरकासुर बनवावेत, जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अनेकांचा हातभार लागला, त्यांचे तसेच सहभागी मंडळे, प्रेक्षक आणि पोलीस प्रशासनाचे आम्ही ऋणी आहोत, असे सौरभ ताम्हणकर यावेळी म्हणाले.
