डींगणे ग्रुप ग्रामपंचायतीची जिल्हा प्रबंधक यांच्याकडे मागणी
बांदा/प्रतिनिधी
डिंगणे गावात वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर येथील बिएसएनलचा मोबाईल मानोरा तात्काळ बंद पडतो. यामुळे ऑनलाईन प्रशासकीय कामे खोळंबत असल्याने याठिकाणी जनरेटर बसवावा अशी लेखी मागणी डिंगणे ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने दुरसंचारचे जिल्हा प्रबंधक यांच्याकडे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, डिंगणे गावातील विद्युत पुरवठा हा जंगल भागातून असल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर काम करताना विद्युत कर्मचाऱ्यांना बराच कालावधी लागतो आणि जंगल भाग असल्याने असे प्रकार वारंवार होत असतात. त्यामुळे बी.एस.एन.एल.चा मोबाईल मानोरा वारंवार बंद पडत असतो. बी.एस.एन.एल. टॉवर बंद पडल्यामुळे गावातील ऑनलाईन सेवा ठप्प होतात. तसेच ग्रामपंचायत, शाळा, पोस्ट ऑफिस, व शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करताना वारंवार टॉवर बंद पडत असल्यामुळे अडचणी निर्माण होतात. याबाबत वर्षभरापूर्वी आपल्या कार्यालयात पत्राद्ववारे आमच्या समस्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. जवळजवळ एक वर्ष पुर्ण होत आले. तरी आमच्या समस्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आज विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर बी.एस.एन.एल टॉवर बंद पडतो. तरी वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मनोऱ्याची प्रत्यक्ष पाहणी याठिकाणी जनरेटर सुरू करावा, किंवा नवीन बॅटरी टाकून ग्राहकांना होणारा त्रास विचारात घेऊन त्यांच्या समस्या दूर करण्यास सहकार्य करावे.
याबाबत दुरसंचार कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्याचे डिंगणेचे माजी उपसरपंच जयेश सावंत यांनी सांगितले.
