बबली राणे यांच्या कर्तव्यदक्षतेने वाचला कोंबड्यांचा जीव
⚡कणकवली ता.१२-: सामाजिक कार्यकर्ते आणि ओसरगावचे माजी उपसरपंच बबली राणे यांनी पुन्हा एकदा कर्तव्यदक्षतेने मुक्या प्राण्यांचा जीव वाचवला आहे. ओसरगाव येथील श्याम सावंत यांच्या फार्म हाऊसमध्ये एक अजस्त्र अजगर शिरला होता. हा अजगर तेथील कामगारांना आढळताच त्यांनी श्याम सावंत यांना फोनद्वारे कळविले.
सावंत यांच्या कानावर ही बातमी पडताच त्यांनी बबली राणे यांना तात्काळ याविषयीची माहिती दिली. त्यानंतर ताबडतोब बबली राणे ओसरगाव येथील सर्पमित्र रोहित राणे यांना घेऊन त्याठिकाणी दाखल झाले. सर्पमित्र रोहित राणे यांनी शिताफीने त्या अजगराला पकडले आणि नैसर्गिक अधिवासात सोडले. या तात्काळ केलेल्या मदतीमुळे आठ ते दहा कोंबड्यांचा जीव वाचला. त्यामुळे श्याम सावंत यांनी बबली राणे आणि रोहित राणे यांचे आभार मानले. या मदतकार्यात अक्षय राणे, राहुल आंगणे, महेश मोरये तसेच इतर ग्रामस्थांनी मदत केली.
