⚡मालवण ता.१२-: जागतिक हवामान बदलाबाबत जाणीवजागृती होण्याच्या दृष्टीने युनिसेफ (युनायटेड नेशन्स चिल्डरन्स फंड) आणि पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांच्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक- युवतींसाठी हवामान बदलविषयक एक दिवसीय कार्यशाळा मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे संपन्न झाली. या कार्यशाळेचे आयोजन जागतिक युथ क्लायमेट ऍक्शन कार्यक्रमांतर्गतच्या ‘महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ऍक्शन (MYCA)’ या प्रकल्पांतर्गत करण्यात आले होते. हवामान बदलाचे परिणाम आणि हवामान बदलाच्या विरुद्धच्या लढ्यामध्ये युवक-युवतींची भूमिका काय असू शकते यावर कार्यशाळेमध्ये चर्चा करण्यात आली.
हवामानबदल हे २१व्या शतकातील एक सर्वात मोठे आव्हान आहे. यामुळे ऋतुचक्रामध्ये होणारे बदल, उष्णतेच्या लाटा, पूर, चक्रीवादळे अशा नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढणे अशा विविध घटना मानव अनुभवत आहे. हवामान बदलाचे हे परिणाम पुढील पिढ्यांना अधिकच तीव्रतेने सहन करावे लागणार आहेत. हवामान बदलाविषयी युवक-युवतींची भूमिका सध्या महत्वाची ठरत असून हवामान बदलासाठी अनुकूल असे बदल आपल्या जीवनपद्धतीमध्ये करणे यासाठीही युवक-युवती महत्वाची भूमिका बजावू शकतात. यादृष्टीने MYCA कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये युवकांसाठी अशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. मालवणमध्ये झालेल्या कार्यशाळेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध स्वयंसेवी संस्थामधील युवक सहभागी झाले होते.
या कार्यशाळेमध्ये हवामानबदल, हवामानबदलाचा शेती, जैवविविधता, आरोग्य, यावर होणारा परिणाम, हवामानबदलामुळे येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्ती, किनारी भागातील कचरा व्यवस्थापन, जलसुरक्षा यातील आव्हाने अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. युनिसेफचे बालाजी व्हरकट आणि पर्यावरण शिक्षण केंद्राचे अमर करण, सुजीत डोंगरे, कुणाल जयस्वाल, अवधूत अभ्यंकर आणि टीम संगमचे संजय वराडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सहभागी युवक-युवतींनी यासाठी आपल्या स्थानिक पातळीवर राबवता येतील अशा कृती कार्यक्रमांचे नियोजन यावेळी केले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी बॅ. नाथ पै सेवांगणचे सचिव लक्ष्मीकांत खोबरेकर, संजय वराडकर यांचे सहकार्य लाभले.
