⚡सावंतवाडी ता.३०: मुलांना बालवयात योग्य व सात्विक आहार मिळाल्यास त्यांची शारीरिक व मानसिक जडणघडण योग्य रीतीने होऊन गुणवत्तापूर्ण विकास होतो, असे प्रतिपादन सावंतवाडी पंचायत समितीच्या माजी सदस्य मनीषा गोवेकर यांनी धाकोरा येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
पोषण आहार अभियानांतर्गंत राज्यभर सुरू असलेला कार्यकम अंगणवाडी धाकोरा येथे पार पडला. यात ६ महीने ते ३ वर्षे तसेच ४ ते ६ वर्षे अशा गटात मुलांची सुदृढ बालक स्पर्धा आयोजित करण्यात आली. यातील सहभागी बालकांना शैक्षणिक साहित्य तसेच प्रशस्तीपत्रक देण्यात आले. यावेळी पालकांनी पोषण आहार तसेच पालेभाज्या यांची मांडणी केली. अंगणवाडी सेविका मनाली साटेलकर यांनी पालकांना आहारातील पालेभाज्यांचे महत्व सांगितले.
दरम्यान माजी पं.स. सदस्या मनीषा गोवेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पालकांनी मुलांना आरोग्याच्या दृष्टीने कोणता आहार द्यावा तसेच सुरुवातीपासूनच त्यांना स्वच्छतेची सवय लावावी. बाल वयात दिलेले संस्कार हे चिरकाल टिकणारे असतात म्हणून त्यांच्या मनावर योग्य ते संस्कार द्यावेत तसेच शुद्ध शाकाहारी व सात्विक आहार दिल्यास बालकांचे योग्य पोषण भरण होते असेही गोवेकर यांनी सांगितले.
यावेळी अंगणवाडीतील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून बालसाहित्य देऊन सर्व यशस्वी मुलांचे तसेच पालकांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित ग्राम पंचायत सदस्या संध्या मुळीक, भारती मुळीक तसेच आशाताई श्रृती सातार्डेकर यांनीही मुलांचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमास वसवाचे तळे अगणवाडी सेविका सौ. गोवेकर, तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकम यशस्वी केल्याबद्दल सर्व पालकांचे अंगणवाडी सेविका मनाली साटेलकर यांनी आभार मानले.
