चोरीचा विशेष पथक नेमून तपास करावा

युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पोलिसांचे वेधले लक्ष

⚡कणकवली ता.२४-: कणकवली शहरात एकाच वेळी एका कॉम्प्लेक्समधील तब्बल दहा फ्लॅट फोडून चोरी केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या चोरीचा विशेष पथक नेमून तपास करावा अशी मागणी पोलिसांकडे केल्याची माहिती युवा सेना जिल्हाप्रमुख नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिली.

या घरफोडी संदर्भात कॉम्प्लेक्स मधील नागरिकांना माहिती मिळताच चोरट्याना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही नागरिकांवर हल्ला देखील करण्याचा प्रयत्न झाला. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाल्याचे समोर आले आहे.याबाबत सुशांत नाईक यांनी सकाळीच कणकवली पोलिसांची पोलीस स्टेशनमध्ये भेट घेत त्यांचे या मागणीकडे लक्ष वेधले. कणकवली शहरात हे असे प्रकार गंभीर असून याची गांभीर्याने दखल घेत तातडीने तपास होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यावर पोलिसांकडून याप्रकरणी तात्काळ उपाय योजनेची ग्वाही देण्यात आल्याची माहिती सुशांत नाईक यांनी दिली. पोलिसांचे या तपासाकरिता विशेष पथक नेमण्या सोबतच श्वानपथकाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही यावेळी पोलिसांनी सांगितल्याची माहिती नाईक यांनी दिली. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे व पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांच्यासह पोलीस हवालदार किरण मेथे आदींनी घटनास्थळी जात पाहणी केली असून, पोलिसांची तपासाची चक्रे गतीने फिरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तातडीने तपास सुरू करण्यात आल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page