प्रदूषण नियंत्रण मंडळाने समुद्र किनाऱ्याची केली पाहणी

तेलवाहु जहाजाला जलसमाधी मिळाल्याच्या पाश्व भूमीवर घेतली खबरदारी

मालवण (प्रतिनिधी)
विजयदुर्ग ते देवगड दरम्यानच्या खोल समुद्रात शुक्रवारी एमटी पार्थ या तेलवाहू जहाजाला जलसमाधी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या पथकाकडून आज मालवण येथील समुद्राच्या पाण्याचे नमुने घेतानाच किनाऱ्यांवर आढळून आलेल्या डांबर सदृश्य द्रवाचे नमुनेही या पथकाने घेतले असून द्रव व समुद्री पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून सध्या किनाऱ्यावर दिसून येणारे डांबर सदृश्य द्रव हे तेल नसल्याची माहिती प्रदूषण नियंत्रक मंडळाचे क्षेत्र अधिकारी अमित लाटे यांनी दिली.

दरम्यान, वेंगुर्ला आणि देवगड किनाऱ्यावर आढळून आलेल्या डांबर सदृश्य काळ्या रंगाचा द्रवा प्रमाणे चिवला बिचसह इतर किनाऱ्यांवरही डांबर सदृश्य काळ्या रंगाचा द्रव दिसून आला आहे

विजयदुर्ग ते देवगड दरम्यान ४० ते ४५ वाव खोल समुद्राच्या पाण्यात एमटी पार्थ हे तेलवाहू जहाज १६ सप्टेंबर रोजी अपघातग्रस्त होऊन बुडाले. या जहाजावरील १९ कर्मचाऱ्यांना वाचविण्यात कोस्टगार्डला यश आले होते. या जहाजाच्या परिस्थितीवर कोस्टगार्डसह जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. या जहाजाच्या अपघातामुळे तेलगळती होऊन समुद्रात तेल प्रदूषण होण्याची शक्यता असल्याने जहाजातून तेल गळती झाली की नाही याची पाहणी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने रत्नागिरीच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांना लेखी कळवून सर्व्हे करण्याचा व समुद्राच्या पाण्याची तपासणी करून अहवाल सादर करण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाकडून रत्नागिरी ते वेंगुर्ला पर्यंतच्या समुद्राचा सर्व्हे करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर आज दुपारी प्रदूषण नियंत्रक मंडळाचे पथक मालवणच्या चिवला बीच किनाऱ्यावर दाखल झाले. यावेळी मंडळाचे क्षेत्र अधिकारी अमित लाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी किनाऱ्यावर पाहणी करत समुद्राच्या पाण्याचे नमुने घेतले. यावेळी मालवण मधील सागरी सुरक्षा पर्यवेक्षक सागर परब, सागरी सुरक्षा रक्षक रोहन खराडे आदी उपस्थित होते.

काल वेंगुर्ला येथील समुद्र किनाऱ्यावर डांबर सदृश्य काळ्या रंगाचा द्रव सापडून आल्यानंतर आज याच प्रकारचे डांबर सदृश्य द्रव मालवण चिवला बिचसह इतर किनाऱ्यांवर दिसून आले आहेत.

जहाज अपघाताच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी ते वेंगुर्ला दरम्यानच्या समुद्राचा सर्व्हे आपले पथक करत असून रत्नागिरी व देवगड येथील पाहणीनंतर आपण मालवणात दाखल झालो आहोत. यानंतर वेंगुर्ला समुद्राचा सर्व्हे होणार आहे. येथील समुद्राचे पाणी आणि किनाऱ्यावर दिसून आलेले डांबर सदृश्य द्रवाचे नमुने आपण घेतले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी क्षेत्र अधिकारी अमित लाटे यांनी दिली.

पार्थ हे तेलवाहू जहाज बुडाल्यामुळे तेल गळती होऊन समुद्रात तेल प्रदूषणाची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी जहाजातील कंटेनरमधून तेल गळती होण्याची शक्यता कमी आहे, असे अमित लाटे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page