आंबा, काजू बागायतदार २७ रोजी करणार उपोषण
सिंधुदुर्गनागरी ता १६
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ति योजनेअन्तर्गत २ लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी,तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी. यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी २७ सप्टेम्बर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे निवेदन आज जिल्हाधिकारी याना दिले.
सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी संघटनेच्या वतीने शासन स्तरावर गेले सात ते आठ महिने वेळोवेळी पाठपुरावा करून तसेच आंदोलन, उपोषण छेडून सुद्धा खावटी कर्जदारांना व दोन लाखावरील कर्जदारांना अद्याप पर्यंत न्याय मिळालेला नाही. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमधील सन २०१५ ते २०१९ मधील २ लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी. तसेच २०१५ पासून खावटी कर्जदार कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी. अल्पभूधारक व मध्यम मुदतीची कर्जे कोविड कालखंडात भरता आलेली नाहीत, यावर कर्जमाफी मिळावी. तोक्ते वादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राहिलेली नुकसान भरपाई तात्काळ मिळावी, तसेच दरवर्षी खरीप व रब्बी पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे तरी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. आदी मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २७ सप्टेंबर पासून लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याचा इशारा जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी शंकर घारे, गंगाराम राउळ, अशोक सावंत, वैभव तांडेल, यशवंत सावंत, गुंडू परब, सुनील घोगळे, भाई धर्ने, विजय भगत, नारायण गावडे, रमाकांत पेडणेकर, सुधीर परब, गोपाळ गावडे, यशवंत तेली, विठ्ठल माळकर, आदींसह सुमारे ४० हून अधिक कर्जदार शेतकऱ्यांनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत.
