⚡कणकवली ता.०३-: कोरोनाची भयछाया दूर झाल्यानंतर सण आणि उत्सवांवरील निर्बंध हटविल्यामुळे
यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असून लाडक्या गणरायाच्या आगमनापाठोपाठ शनिवारी म्हणजे गौरींचे कणकवली तालुक्यात घरोघरी उत्साहात आगमन झाले.
गौरी आगमनाप्रसंगी महिलांचा दांडगा उत्साह दिसून आला.
भक्तीमय वातावरणात मृदुंग-टाळ यांच्या गजरात सकाळी ‘गौराई आली सोन्या मोत्याच्या पावलांनी’ आगमन घरोघरी झाले. कोकणात खड्यांच्या आणि मुखवट्याच्या अश्या दोन प्रकारात गौरी आणल्या जातात. पारंपरिक पद्धतीने आघाडा, तिरडा, सोंतळ या वनस्पती घेऊन विहिरी किंवा नदीकिनारी जाऊन यावनस्पतींची विधीवत पूजा करुन मृदुंग व टाळाच्या गजरात या वनस्पतींना घरी आणले जाते. तत्पूर्वी घरी नेण्यापूर्वी मीठ, हळद अंगावरुन दृष्ट काढल्यानंतर गणरायाच्या डाव्या बाजूला तिची गौरी या रुपात पूजा केली जाते, अशी पारंपारिक प्रथा आहे. रात्री गौरीला नऊवारी हिरवी साडी नेसवून तिचा मुखवटा रत्नजडीत
आभूषणांनी सजवला जातो. गौरीपूजनाच्या दिवशी दुपारी काही गावांमध्ये गौरीला
मांसाहार नैवेद्य दाखवला जातो तर काही घराण्यांमध्ये शाहाकारी (पुरण पोळी) नैवेद्य दाखवला जातो. गौरीच्या सजावटीसाठी लागणारे अलंकार व विविध आभूषणे खरेदीसाठी
बाजारपेठत महिलांनी गर्दी केली होती. गौरी ही दीड दिवसाची माहेरवाशीण असते, अशी आख्यायिका आहे. शनिवारी
सकाळपासूनच माहेरवासिनी आपल्या माहेरी दाखल झाल्या होत्या.गौरीपूजनादिवशी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचा ‘ओवसा’ भरण्याचा कार्यक्रम
मोठ्या थाटात साजरा होतो.
