कवयित्री सरिता पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार ‘काव्यप्रभा’ कविसंमेलन

⚡कणकवली ता.२५-: कवयित्री सरिता पवार यांच्या अध्यक्षतेखाली ३८ व्या युवा वर्धापन दिनानिमित्त अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांसाठी आणि ज्येष्ठांसाठी जिल्हास्तरीय ‘काव्यप्रभा’ या काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक २८ ऑगस्ट, २०२२ रोजी कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रम येथे हे काव्यसंमेलन संपन्न होईल. कवयित्री सरिता पवार यांच्या अध्यक्षतेखाली हे कविसंमेलन संपन्न होणार असून गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर तसेच अभिनेत्री अक्षता कांबळी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कवयित्री सरिता पवार या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरोगामी विचारांच्या कवयित्री, लेखिका म्हणून सुप्रसिद्ध आहेत.

मागील 22 वर्षांहून अधिक काळ त्या काव्यलेखन, ललीतलेखन करत आहेत.
मूल्याधिष्ठित समाज निर्मितीसाठी युवक युवतींसाठी विविध कार्यक्रम अनुभव शिक्षा केंद्राच्या वतीने सातत्याने महाराष्ट्रात राबविले जातात. संविधानिक मूल्यांच्या माध्यमातून युवकांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी अनुभव शिक्षा केंद्र कार्य करते. युवा संस्था मागिल ३७ वर्षांपासून समाजातील विविध घटकांसोबत बदलाच्या प्रक्रियेमध्ये प्रयत्न करत आहे. साद टीम सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. तसेच ‘शोध स्वत्वाचा’ या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे, शिबिराचे आयोजन करण्यात येते. ३८ व्या युवा वर्धापन दिनानिमित्त यावेळी अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणाईतील काव्य प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि ज्येष्ठांचे त्यांना मार्गदर्शन मिळण्यासाठी जिल्हास्तरीय खुल्या काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अनुभव शिक्षा केंद्राचे राज्य समन्वयक सचिन नाचणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कविसंमेलन संपन्न होणार आहे.
सहभागी सर्व कवींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी अनुभव शिक्षा केंद्रचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर ९७६४९०२१६७ आणि साद टीम समन्वयक श्रेयश शिंदे ९४०४९१७८१४ यांच्याशी संपर्क साधावा.

You cannot copy content of this page