कोविड काळात पती गमावलेल्या महिलांना कणकवली न.पं.चा दिलासा

25 हजाराचे अर्थसहाय्य देणारी पहिलीच नगरपंचायत ठरणार :समीर नलावडे

⚡कणकवली ता.२५-:
कणकवली शहरातील नागरिक असलेल्या व कोविड काळात पती गमावलेल्या विधवा महिलांना नगरपंचायतच्या माध्यमातून 25 हजाराचे अर्थसहाय्य देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय कणकवली नगरपंचायतीने घेतला असल्याची माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.या निर्णयामुळे
कोविडमुळे पतीचे निधन झालेल्या कणकवली शहरातील विधवा महिलांना दिलासा मिळणार असून या निधीतून स्वयंरोजगार निर्माण करण्यास संधी मिळणार आहे त्यामुळे कणकवली नगरपंचायतीचा हा निर्णय अन्य नगरपंचायतीसमोर आदर्शवत ठरणार आहे.
कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात आयोजीत पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष समीर नलावडे बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,नगरसेविका मेघा गांगण, नगरसेवक अभिजीत मुसळे, महेश सावंत, बंडू गांगण आदी उपस्थित होते.
नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले,
देशात व जगात कोविड सारखा महाभयंकर रोग आला होता.महामारीत अनेकांचे मृत्यू व आर्थिक हानी झाली आहे.
पती गमावलेल्या महिलांना आर्थिक मदत देत त्यांना उद्योग व्यवसायात पाय रोवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून या अर्थसहाय्यातून महिलांनी उद्योग करून स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी नगरपंचायतचा हा प्रयत्न असल्याचेही श्री. नलावडे यांनी सांगितले. बहुदा जिल्ह्यात असा निर्णय घेणारी कणकवली ही सर्वप्रथम नगरपंचायत असणार आहे. ज्या महिलांच्या पतीचे कोविडने निधन झाले अशा महिलांचे मतदार यादीमध्ये नाव, रेशन कार्ड हे कणकवली शहरातील असण्याची गरज आहे. तसेच आधार कार्ड देखील आवश्यक आहे. याकरिता कणकवली नगरपंचायत मध्ये एक विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यात विधवा महिला सन्मान २५ हजार निधी देत असल्याबद्दल पहिला निर्णय आमच्या नगरपंचायतने घेतला.त्या सभागृहाचे आम्ही घटक असल्याचे समाधान आहे.आमच्या हातून सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात देत आहोत.या मिळणाऱ्या रक्कमेचा ज्या महिलांना शक्य असेल त्यांनी उद्योग सुरु करावा,असे आवाहन नगरसेविका मेघा गांगण यांनी केले.

You cannot copy content of this page