गौरी गणपतीच्या सणासाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग झाला सज्ज

प्रवाशांच्या आगमनासाठी 191 तर परतीसाठी 127 गाड्या तैनात; ग्रुप बुकिंगलाही प्राधान्य

⚡कणकवली ता.२५-: कोरोना कालखंडानंतर आता रा.प. महामंडळाचा सिंधुदुर्ग विभाग गौरी गणपतीच्या सणासाठी सज्ज झाला आहे. २७ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात १९१ जादा बसेस दाखल होणार आहेत. तर परतीसाठीही ४ ते ११ सप्टेंबर या कालावधीसाठी १२७ गाड्या तैनात ठेवण्यात आल्या असून आतापर्यंत ५४ गाड्या बुकींग झाल्या असून ७३ गाड्या बुकींगसाठी आहेत. तसेच दररोज नियमित नऊ गाड्याही उपलब्ध आहेत तसेच रेल्वे स्थानकांवरून नियमित व जादा गाड्यांच्या वेळेत बसेसचे नियोजन करण्याच्या सूचना सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहे तरी प्रवाशांनी रा.प. महामंडळाच्या बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन एस टी चे सिंधुदूर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी केले आहे.

गणेशोत्सवासाठीच्या नियोजनाबाबत विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी ही माहिती दिली. यावेळी विभागिय वाहतूक अधिकारी मोहनदास खराडे, विभागिय कर्मचारीवर्ग अधिकारी एल. आर. गोसावी उपस्थित होते.

यावर्षी चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. मुंबईहून येणाऱ्या गाड्यांमध्ये २७ ऑगस्ट रोजी २, २८ रोजी ८६ ,२९ रोजी ४३ ,३० रोजी ५४ तर ३१ रोजी ६ गाड्या अशाप्रकारे १९१ गाड्या दाखल होणार आहेत. दाखल होणाऱ्या या गाड्यांमध्ये सावंतवाडी विभाग ८९, मालवण १३, कणकवली ५९, देवगड १२ विजयदुर्ग १० कुडाळ १ व वेंगुर्ले ७ गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय दररोज नऊ नियमित गाड्याही आहेत.

परतीच्या प्रवासासाठी ४ ते ११ सप्टेंबर या कालावधीत १२७ गाड्या बुकींगसाठी उपलब्ध आहेत. यापैकी ५४ गाड्यांचे बुकींग आतापर्यंत झाले आहे. तर ७३ गाड्या बुकींगसाठी उपलब्ध आहेत. तर नियमित ९ गाड्याही उपलब्ध असणार आहेत. तसेच मुंबईहून प्रवासी मोठ्या संख्येने कोकणात येत असतात. परतीच्या प्रवासासाठी प्रत्येक आगारातून ग्रुप बुकींगसाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तशा सूचना सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या असून प्रवाशांनीही या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रसाळ यांनी केले.. परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध असलेल्या १२७ गाड्यांसोबतच मागणीप्रमाणे जादा बसेस उपलब्ध करण्यात येणार आहेत तसेच कणकवलीतील तळेरे बसस्थानक येथे ब्रेकडाऊन व्हॅन तैनात असणार आहे. तर खारेपाटण ते बांदा या मार्गावर फिरते दुरूस्ती पथकही तैनात ठेवण्यात आलेले आहे. मुंबईहून येणाऱ्या गाड्यांना सध्या ज्या पंपांवरून डिझेल पुरवठा होत आहे, त्याठिकाणी उपलब्ध असणार आहे. याशिवाय महामार्गावरही दोन पेट्रोल पंपांवरून डिझेल मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्डे, झाडी आदीबाबत संबंधीत विभागांना कळविण्यात आले आहे. प्रवाशांची मागणी आल्यास थेट गावातूनही बसेस परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध करून देण्याबाबतचे नियोजनही करण्यात आले असल्याचे प्रकाश रसाळ यांनी सांगितले.

रेल्वे स्थानकांवरून प्रवाशांची ने आण करण्यासाठीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. विशेषत: कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या आगारातून नियमित व जादा गाड्यांच्या वेळेमध्ये प्रवाशांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी आगार व्यवस्थापकांनी त्या-त्या पातळीवर नियोजन करण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या असल्याचेही विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी सांगितले.

You cannot copy content of this page