इव्हेंट करण्याच्या नादात नगर परिषदेचे जनतेच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची प्रसिद्धीपत्रकातून टीका

⚡मालवण ता.२५-: गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची शिवसेना माजी नगरसेवकांनी वारंवार भेट घेऊन गणेश चतुर्थी पूर्वी करावयाच्या कामांबाबत लक्ष वेधुनही चतुर्थीला चार दिवस शिल्लक राहिले तरी आद्यपपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. दुपारच्या सत्रात कर्मचाऱ्यांकडून झाडी तोडण्याचे काम करून त्याचे फोटो सेशन करून डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार नगरपालिका प्रशासन करत आहे. गणेशोत्सवापूर्वी शहरात करण्यात येणाऱ्या कामांबाबत नगरपालिका प्रशासनाने दिलेली माहिती दिशाभूल करणारी असून इव्हेंट करण्याच्या नादात न. प. प्रशासनाचे जनतेच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे अशी टीका माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.

गेली सहा महिने मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक याना वारंवार सांगून आणि दीड महिन्यांपूर्वी शिवसेना माजी नगरसेवक यांच्या समवेत त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन येणाऱ्या गणेश चतुर्थीपूर्वी झाडी तोडणे, स्ट्रीट लाईट बाबत ज्यादा कामगार घेणे, ज्यादा लाईट खरेदी करून ठेवणे, सिमेंट पाणंद पावसाळ्यात निसरड्या होतात त्या साफ करणे, हायमास्ट टॉवर बंद आहेत ते दुरुस्त करून घेणे इत्यादी बाबत लेखी पत्र देऊनही गणेश चतुर्थीला चार दिवस शिल्लक असताना कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही. गतवर्षी पर्यंत झाडी साफसफाई मशीन द्वारे करून घेतली जात होती. पण यावर्षी अश्या प्रकारे काम केले जात नाही. डास फवारणी बाबत ज्यादा कर्मचारी घेऊन फवारणी करावी असे वारंवार सांगूनही फवारणी केली गेली नाही. आता न.प. च्या एका कर्मचारी मार्फत फवारणी करून काम सुरू केल्याचा आव आणला जात आहे. स्वच्छता विभागात आवश्यक कर्मचारी यांची भरती न करता ठेकेदारा मार्फत अनावश्यक स्टाफची भरती केली गेली आहे, पण कामाचे कुठलेही नियोजन नाही. त्यामूळे अजूनही स्वच्छते बाबतच्या तक्रारी येत आहेत. फक्त फ़ोटो सेशन करून शासनाला रिपोर्ट पाठवण्याइतपत काम केले जात आहे, अशी टीका महेश कांदळगावकर यांनी केली आहे.

मालवण नगरपालिकेने व्हॉट्सअप ग्रुप स्थापन करून त्यावर नागरिकांनी तक्रार दाखल करण्याच्या सूचना केल्या गेल्या. पण या तक्रारीची दखल तीन तीन महिने घेतली जात नाही ही वस्तुतिथी आहे, अशी टीकाही कांदळगावकर यांनी केली आहे. तसेच दरवर्षी मालवण शहरातील महत्वाच्या व्यक्ती, सामाजिकसौस्था , व्यापारी , लोकप्रतिनिधी यांची गणेश चतुर्थी पूर्वी नियोजन बैठक घेण्यात येते ती पण घेण्यात आलेली नाही. हर घर तिरंगा सारखे कार्यक्रम कुठल्याही लोक प्रतिनिधी ना विश्वासात न घेता राबवले गेले, त्यामुळे किती लोक न.प. कार्यालयात येऊन झेंडे घेऊन गेले त्याची खरी आकडेवारी प्रशासकांनी जाहीर करावी, असेही कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page