महालक्ष्मी दिव्यांग व निराधार सामाजिक संघटनेचा पुढाकार
सिंधुदुर्गनगरी ता २५ आरोग्यास अपायकारक व कॅन्सर सारखा भयानक रोग निर्माण करणारा गुटखा सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोसपणे विक्री केला जातो. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेला हा व्यवसाय तात्काळ बंद करा. अन्यथा २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी आघाडी सरकारने सिंधूदुर्ग जिल्हा “गुटखा विक्री केंद्र” म्हणून घोषित करावा. या अनोख्या मागणीसाठी महालक्ष्मी दिव्यांग व निराधार सामाजिक संघटनेच्या वतीने दिव्यांग बांधवांनी आज जिल्हा परिषदेसमोर ढोल-ताशांचा गजर करत साखळी उपोषण सुरू केले आहे. श्री महालक्ष्मी दिव्यांग व निराधार सामाजिक संघटना सिंधुदुर्ग च्या वतीने आज जिल्हा परिषदेसमोर ढोल-ताशांचा गजर करत जिल्ह्यात राजरोस सुरू असलेल्या गुटखाविक्री विरोधात साखळी उपोषण सुरू केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात त्यानी म्हटले आहे की तंबाखूजन्य, भेसळ, आरोग्यास अपायकारक व कॅन्सर सारख्या उपचार न होणारे रोग निर्माण करणारा गुटखा सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोसपणे आणून विक्री केला जात आहे . महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जबाबदार पोलिस अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांच्या आशीर्वादाने बेधडकपणे कर्नाटक राज्यातून राजरोसपणे आणून महिन्याला सुमारे शंभर कोटीचा गुटखा सिंधुदुर्ग जिल्ह्यात विक्री केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांना हप्ते देऊन त्यांच्या आशीर्वादाने हा व्यवसाय जिल्ह्यात सुरू आहे. असा आरोप केला आहे. तर अनधिकृतपणे जिल्ह्यात सुरू असलेली गुटखा विक्री तात्काळ बंद करा आणि जर ही गुटखा विक्री बंद होणार नसेल तर २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी महाआघाडी सरकारने सिंधुदुर्ग जिल्हा गुटका विक्री केंद्र म्हणून घोषित करावा. अशी मागणी या निवेदनातून केली आहे. यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेसमोर आज पासून साखळी उपोषण सुरू केले आहे. चौदा ते पंधरा वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुले गुटखा सेवन करून कॅन्सरसारख्या रोगाने पीडित असल्याची अनेक उदाहरणे समोर असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाची बंदी असलेला गुटका कर्नाटक राज्यातून सावंतवाडी तालुक्यातील विविध गावांमध्ये हे गोडाऊन बांधणी करून साठवणूक केला जातो तेथून राजरोसपणे जिल्हाभरात वितरित केला जातो मात्र जिल्ह्यात गुटखा विक्रीवर कारवाई करण्याची नौटंकी केली जाते हे माहिती अधिकारात उघड झाले आहे तर जप्त केलेला गुटका पुन्हा संबंधित गुटका विक्रेत्यांना विकला जात असल्याचे समोर आले आहे तरुण मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात हप्ते घेऊन सरकारची बंदी असलेला कोट्यवधी रुपयांचा गुटखा जिल्ह्यात वितरित केला जात असेल व विक्री होत असेल तर सिंधुदुर्ग जिल्हा गुटखा विक्री केंद्र म्हणून घोषित करावे अशी अनोखी मागणी या आंदोलन कर्त्यांनी केली आहे. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष भरत हरी गावकर, सचिव आत्माराम परब, उपाध्यक्ष विठ्ठल शिरोडकर, समीर गवंडे, दशरथ गावकर, आदींसह दिव्यांग बांधव सहभागी झाले आहेत.
