पाडलोस जुन्या रस्त्यावरील धोकादायक चर बुजविला

लोकप्रतिनिधींना मतदानातून उत्तर देणार : बाळा नाईक यांचा इशारा

⚡बांदा ता.१२-: लोकप्रतिनिधींकडे वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी करुनही दुर्लक्ष झाले. दोन वेळा अपघात होऊनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने अखेर शेवटी न्हावेली-पाडलोस-रोणापाल जुन्या मार्गावरील केणीवाडा येथे पडलेला चार फुटी चर न्हावेली, सोनूर्ली, दांडेली व पाडलोस ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजविला.
दूध व्यावसायिक बाळा नाईक यांचा चरात पडून अपघात झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यानंतर रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाची मागणीही केली होती. परंतु सदर समस्या अधांतरी राहिले. न्हावेली, पाडलोस, रोणापाल तीन गावांना जोडणारा जुना मार्ग आरोस, दांडेली, पाडलोस-सातीवनमळी, भाकरवाडी तसेच रोणापाल येथील ग्रामस्थांना महत्त्वाचा आहे. दीड ते दोन किलोमीटर रस्ता खडीकरण होणे बाकी असून अनेक वर्षे प्रलंबित असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींच्या झालेल्या दुर्लक्षामुळेच आम्हाला अशा यातना सहन कराव्या लागत असल्याचे मत बाळा नाईक यांनी व्यक्त केले. तसेच केवळ निवडणुकांत पुरतेच आमच्याकडे येतात व विकासाची आश्वासने देतात. परंतु त्याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांत आम्ही लोकप्रतिनिधींना मतदानातूनच योग्य ते उत्तर देऊ असे सांगत श्री.नाईक यांनी नाराजी व्यक्त केली.

You cannot copy content of this page