मंत्रालयातील दस्तऐवज हेराफेरी प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टार्गेट;ट्विट करीत भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
मालवण (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केल्यानंतर फाईलमधील शेराच बदलल्याचा गंभीर प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या खातेनिहाय चौकशी प्रकरणात समोर आल्याने यावरून भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी सरकारवर टीका केली आहे. “मंत्रालयाच्या दस्ताऐवजांची हेराफेरी होऊ लागली तर मुख्यमंत्री पदाचं महत्व काय ? बीएमसी असो वा राज्य सरकार, लक्ष फक्त टक्केवारीवर… बाकी सगळे रामभरोसे” असं ट्विट त्यांनी करत सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केल्यानंतर फाईलमधील शेराच बदलल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात फसवणुक आणि धोकाधडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधीक्षक अभियंत्याच्या खात्यातर्गत चौकशीच्या फाईलवर सही केली होती. मात्र, याच फाईलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीच्या अगदी वर लाल शाईने चौकशी बंद केली पाहिजे असा बनावट शेरा लिहिला होता. या प्रकरणात अनोळखी व्यक्तीविरोधात एफआयआर नोंद करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे. ही बाब फारच धक्कादायक व गंभीर आहे. मुख्यमंत्र्याच्या सही नंतर अंमलबजावणीला सुरुवात होते आणि त्यातच जर मंत्रालयाच्या दस्ताऐवजांची हेराफेरी होऊ लागली तर मुख्यमंत्री पदाचं महत्व काय ??? बीएमसी असो व राज्य सरकार, लक्ष फक्त टक्केवारी वर… बाकी सगळे रामभरोसे असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
