‘भारतीय संशोधक’ पुस्तकातून मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल – सुरेश ठाकूर

⚡मालवण ता.२६-: केंद्रशाळा मसुरे नं.१ चे शिक्षक व साने गुरुजी कथामाला मालवणचे सदस्य श्री. गुरुनाथ ताम्हणकर यांनी मुलांसाठी लिहिलेल्या ‘भारतीय संशोधक’ या पुस्तकाचे प्रकाशन कथामाला मालवण व को.म.सा.प. मालवणचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. भारतीय संशोधकांची छोटी चरित्रे वाचून मुलांना भविष्यात त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा होईल. या पुस्तकामुळे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन यावेळी सुरेश ठाकूर यांनी केले.

साने गुरुजी कथामाला मालवणने राबविलेल्या ‘कथा सांगू आनंदे- विज्ञान कथा’ या उपक्रमाने प्रेरीत होवून आपल्या विध्यार्थांना भारतीय शास्त्रज्ञांची कथारुप माहिती व्हावी या हेतूने गुरुनाथ ताम्हणकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तिकेत जयंत नारळीकर, मोक्षगुंडम विश्वेश्वरैया, आर्यभट्ट, विजय भटकर, होमी भाभा, विक्रम साराभाई, रामानुजन, व्यंकट रामन या भारतीय शास्त्रज्ञांची चित्रे, चरित्रे, प्रसंग समाविष्ट आहेत.

यावेळी कु. मानसी पेडणेकर व कु. श्रेया मगर यांनी या पुस्तकातील विज्ञानकथा सांगितल्या. कु. आदित्य मेस्त्री याने ‘शिवरायांवरील पोवाडा’ सादर केला. कु. यशश्री ताम्हणकर हिने पुस्तकाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. आभार विनोद सातार्डेकर यांनी मानले. यावेळी माजी शिक्षण विस्तार अधिकारी सदानंद कांबळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मेश मसुरेकर, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवराज सावंत, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, मुख्याध्यापिका शर्वरी सावंत, दिप्ती पेडणेकर, मयुरी शिंगरे, शिक्षक गोपाळ गावडे, विनोद सातार्डेकर, रामेश्वरी मगर, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page