⚡मालवण ता.२५-: मालवणात आलेल्या पर्यटकांनी कार धुण्यासाठी थेट समुद्रात नेल्याची घटना काल घडली असताना याप्रकरणी मालवण पोलिसांनी संबंधित कार चालकाला १५०० रुपयांचा दंड केला आहे.
मालवण समुद्र किनारी काल पर्यटकांनी आपली कार धुण्यासाठी थेट समुद्रात लोटली. यावेळी कार मातीत रुतल्याने पर्यटकांची फसगत झाली. यावेळी स्थानिक नागरिकांनी ही कार पाण्याबाहेर आणली. पर्यटकांनी कार समुद्र किनारी नेण्याच्या तसेच किनाऱ्यावर कार चालवून स्टंटबाजी केल्याच्या घटना घडत असताना पोलीस यंत्रणा मात्र यापासून अनभिज्ञ असल्याचे चित्र होते. मात्र अशा पर्यटकांवर पोलिसी कारवाई होण्याची मागणी मालवण वासीयांकडून होत राहिल्याने कार समुद्रात धुण्यासाठी नेणाऱ्या पर्यटकांवर मालवण पोलिसांनी १५०० रुपयांचा दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच यापूर्वी मालवण किनाऱ्यावर स्टंटबाजी करणाऱ्या गाडी चालकाचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. मालवणच्या समुद्रात जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी सांगितले.
