तालुक्यातील परजिल्ह्यातील मुलांची संख्या घटली;जिल्हा सरचिटणीस प्रसन्न देसाई यांचा दावा
वेंगुर्ला प्रतिनिधी- केंद्र शासनाच्यवतीने घेण्यात येणा-या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेप्रश्नी वेंगुर्ला भाजपाने केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.परजिल्ह्यातील मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण घटले असून वेंगुर्ला तालुक्यातून जिल्ह्याबाहेरील फक्त तीनच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी दिली.
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी परीक्षेला बसत असतात. मात्र असे असतानाही परजिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा नंबर नवोदयसाठी लागतो व सिंधुदुर्गातील विद्यार्थी वंचित राहतात. गेल्या अनेक वर्षापासून हीच स्थिती आहे. या प्रकाराला शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार जबाबदार आहे, तेवढेच ज्या शाळा अशा परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांची कागदोपत्री उपस्थिती दाखवतात त्या शाळाही जबाबदार आहेत. नवोदयसाठी यावर्षी वेंगुर्ला तालुक्यातुन परजिल्ह्यातील ३६ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार होते. परंतु वेंगुर्ला भाजपाच्यावतीने स्थानिक विद्यार्थ्यांच्या पालकांना सोबत घेऊन वेंगुर्ला परीक्षा केंद्रावर आंदोलन छेडण्यात आले होते. परंतु, पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने ३६ मुलांपैकी काही मुलेच परीक्षा देऊ शकली. त्यामुळे परजिल्ह्यातील मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण घटले व वेंगुर्ले तालुक्यातुन परजिल्ह्यातील फक्त तीनच मुले उत्तीर्ण झाली. लवकरच वेंगुर्ला तालुका भाजपाचे शिष्टमंडळ पास झालेली तीन विद्यार्थी सोडून उर्वरित ३३ विद्यार्थी हे सहावीच्या वर्गात आहेत की नाही याची खातरजमा करणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, दादा केळुसकर, शशी करंगुटकर आदी उपस्थित होते.
