नियोजन करुन अभ्यासातून पुढे जा!-धनराज आंबेतकर

⚡वेंगुर्ला ता.२२-: मुलांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे. स्वतःचे ध्येय कोणते हे जाणून अभ्यासात प्रामाणिकपणा, नियमितता आणून वेळेचे नियोजन करुन अभ्यासातून पुढे जावे असे मत कॅनरा बँक वेंगुर्ला शाखाधिकारी धनराज आंबेतकर यांनी वेंगुर्ला येथे व्यक्त केले.

  वेंगुर्ला नगरवाचनालयाचा विद्यार्थी गुणगौरव, पारितोषिक वितरण आण्णि व्यासंगी पुरस्कार वितरण असा एकत्रित कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर अध्यक्ष अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर, उपाध्यक्ष अॅड.देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार तसेच व्यासगी पुरस्कार प्राप्त प्रा.अरविद सावंत आदी उपस्थित होते.

  बँक करिअर करणा-यांनी माझ्याशी संफ साधावा. विद्यार्थीदशेतच असताना बँकेमध्ये खाते असावे. कारण पुढे शैक्षणिक कर्ज हवे असल्यास त्याचा उपयोग होतो अशी माहिती श्री.आंबेतकर यांनी दिली. पुस्तकी ज्ञानातून अभ्यासू जीवनाची वाटचाल, आर्थिक बाजू विद्यार्थ्यांना समजते. त्यासाठी नगर वाचनालयातील ग्रंथांचा तिथल्या स्पर्धापरीक्षा पुस्तके, नियतकालिके यांचा वापर करावा असे अॅड.प्रभूखानोलकर यांनी सगितले. सन १९८९ पासून आजपर्यंत दात्यांनी दिलेल्या देणगीतून विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जात आहेत. आत्मविश्वासापेक्षा जिद्द व ध्येय यातून विद्यार्थ्यांनी आपला विश्वास साधावा असे आवाहन अनिल सौदागर यांनी केले.

  या कार्यक्रमात पहिली ते पदवीपर्यंतच्या सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे देण्यात आली. श्रीराम मंत्री यांनी सन २००२ मध्ये दिलेल्या सुदत्त कल्याध निधीतून स्व.सुमित्रा मंत्री स्मृती व्यासंगी वाचक पुरस्कार व स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख ५०० असा यंदाचा पुरस्कार संस्थेचे नियमित वाचक तसेच कुडाळ ज्युनिअर कॉलेजचे प्रा.अरविद सावंत यांना अॅड. देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमात कार्योपाध्यक्ष शांताराम बांदेकर, उपकार्यवाह माया परब, सदस्य महेश बोवलेकर, दीपराज बिजितकर, मंगल परुळेकर, स्थानिक हिशेब तपासनीस श्रीनिवास सौदागर, किरातच्या संपादक सीमा मराठे यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
You cannot copy content of this page