*💫सिंधूदुर्गनगरी दि.२२-:* मालवण तालुक्यातील देवबाग ग्रामपंचायतने खोटे घर नंबर दिल्या प्रकरणी दोषीवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी माजी ग्राम पंचायत सदस्य रमेश पांडुरंग कद्रेकर हे २६ जानेवारी रोजी जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण करणार आहेत. याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यांना दिले आहे. देण्यात आलेल्या निवेदनात ‘अस्तित्वात नसलेल्या घरांना देवबाग ग्राम पंचायतींने घर नंबर दिले आहेत. याबाबत आपण ३ डिसेबर २०२० रोजी व ११ जानेवारी २०२१ रोजी लेखी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, दोषीवर कारवाई न करता त्यांना पाठीशी घातले जात आहे. मागील दीड महिन्यात माझ्या तक्रारिची दखल घेवून कार्यवाही करण्यात आली असल्यास त्याबाबत आपल्याशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही. त्यामुळे आपण यापूर्वी दिलेल्या इशाऱ्या नुसार २६ जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषणास बसणार आहे.’ असे नमूद केले आहे. देवबाग ग्राम पंचायतने एकाच जागेवर १५ घर नंबर दिले आहेत. तर दुसऱ्या जागेवर देण्यात आलेल्या घर नंबर ठिकाणी हाउस बोट उभी करून ठेवण्यात आली आहे. ग्राम पंचायतींने ७३७, ११५९, १०७३, ११५०, १०७५, १०७४, १०७२, १०७१, ११४२, ११४३, ११४४, ११४५, ११४६, ११४७, ११४८, ११४९ हे दिलेले घर नंबर इमारत अस्तित्वात नसताना जमीन मालकाशी आर्थिक तडजोड करून दिले, असल्याच्या आरोप उपोषणकर्ते रमेश कद्रेकर यानी केला आहे.
देवबाग ग्रामपंचायत विरोधात रमेश कद्रेकर यांचे २६ जानेवारी रोजी आमरण उपोषण…
