नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली माहिती
⚡कणकवली ता.१४-: नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच कणकवली नगरपंचायत ला नागरी सहाय्य योजना विकसित करणे या कामाकरिता 2 कोटी 49 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात मागणी केली होती. दोन दिवसांपूर्वीच कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून आमदार नितेश राणे यांच्याकडे ही निधीची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी या संदर्भात तातडीने सरकारकडे पाठपुरावा केला. त्यानुसार राज्य शासनाने तातडीने कणकवली नगरपंचायत ला हा निधी मंजूर केल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.
या योजनेअंतर्गत कणकवली शहरातील जनतेच्या हिताची अनेक निधी अभावी रखडलेली कामे करता येणार आहेत. आमदार नितेश राणे यांनी याकरिता सरकार स्थापन झाल्यानंतर तातडीने निधी मंजुरीची मागणी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेण्यात आली असल्याचेही श्री नलावडे यांनी सांगितले. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा व सुविधा या निधीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेला प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली आहे. त्यामुळे कणकवली शहरात आता या योजनेअंतर्गत लवकरच कामे सुरू करण्याचा मार्ग निधीमुळे मोकळा झाला आहे.
